Sanjay Shirsat On Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या शपथविधीची चर्चा पाहायला मिळत आहे. या शपथविधीची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) देखील होती, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. मात्र यातच आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. पहाटेच्या शपथविधीची माहिती शरद पवारांप्रमाणे संजय राऊतांना (Sanjay Raut) देखील होती असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे.
'एबीपी माझा'शी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, पहाटेच्या शपथविधीबाबत संजय राऊत यांना देखील माहिती होती. संजय राऊत पडद्यामागून काम करत होते. त्यांना हे प्रकरण माहित होते. त्यामुळे पहाटेचा शपथविधी घडवून आणण्यामागे संजय राऊत यांचा मोठा वाटा असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे.
पुढे बोलताना शिरसाट म्हणाले की, संजय राऊत सायको आहेत, ते कधी काय बोलतील आणि कोणाला अडचणीत आणतील हे सांगताच येत नाही. उद्धव ठाकरे यांची जी अडचण वाढली आहे, ती फक्त या सायको भुमिकेने झाली आहे. संजय राऊत वक्तव्य करतात आणि ते निस्ताराचे काम उद्धव ठाकरे यांना करावे लागत होते. हे सर्व उद्धव ठाकरे यांना देखील माहित आहे. तर सायकोपणा करणे आणि जे घडलं नाही त्यावर भाष्य करणे यात राऊत यांना आनंद मिळत असल्याचे देखील संजय शिरसाट म्हणाले.
अजित पवार बोलले तर बॉम्बस्फोट होईल...
पहाटेच्या शपथ विधीची सर्व माहिती संजय राऊत यांना होती. त्यामुळे यावर आज संजय राऊत कोणतेही प्रतिक्रिया देत नाही. याबाबत जर अजित पवार बोलले तर बॉम्बस्फोट होईल. कारण अजित पवार हे फार स्पष्ट बोलणारे नेते आहे. त्यामुळे यावर त्यांनी वक्तव्य केल्यास राज्याच्या राजकारणात बॉम्बस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच पहाटेच्या शपथ विधीची सर्व माहिती संजय राऊत यांना असल्याचं उद्धव ठाकरे यांना कळाले होते. मात्र परिस्थिती अशी झाली होती की, दुर्दैवाने राष्ट्रवादीसोबत जावे लागले होते. पण पुढे राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचं देखील संजय शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: