Aurangabad News: मानवी व प्राणी जिवीतास धोकादायक ठरणाऱ्या नायलॉन मांजाविरोधात (Nylon Manja) औरंगाबाद शहर पोलिसांकडून (Aurangabad City Police) विशेष पथकांची स्थापना करूनही हे पथक अपयशी ठरत असल्याचे समोर येत आहे. कारण औरंगाबादमध्ये जेवणाचा डब्बा घेऊन जाणाऱ्या एका विद्यार्थ्याचा गळा नायलॉन मांजाच्या दोऱ्याने कापला गेला असल्याची घटना समोर आली आहे. चैतन्य शंकर मुंढे (वय 19 रा. गंगाखेड परभणी, हल्ली मुक्काम बेगमपुरा औरंगाबाद) असे या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर उपचार सुरु आहे. 


बारावीच्या शिक्षणानंतर नीटची तयारी करण्यासाठी चैतन्य राहण्यासाठी औरंगाबादमध्ये मामाकडे आला आहे. दरम्यान आज सकाळी जेवणाचा डबा आणण्यासाठी चैतन्य हा बेगमपुऱ्यातून विद्यापीठ गेटकडे जात होता. गाडीवर जात असताना अचानक विद्यापीठाजवळ त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा लागला. ज्यात चैतन्य जखमी झाला असून, त्याचा सात ते आठ इंच गळा कापला गेला आहे. त्याने गाडी थांबून बघितले असता त्याच्या गळ्याला गंभीर दुखावत झाली होती. सुदैवाने त्याच्या दुचाकीचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान त्याने तात्काळ ही बाब मामाला कळवल्यानंतर त्याचे मामा सुदर्शन लटपटे यांनी त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. 


पोलिसांचे पथक अपयशी! 


औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी बंदी असलेला नायलॉन बिनधास्तपणे विकला जातो. त्यामुळे अशा लोकांवर कारवाईसाठी औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी, नायलॉन मांजा विक्री रोखण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे एक विशेष पथक तयार केले आहेत. या पथकाकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली होती. मात्र असे असतांना देखील शहरात ठिकठिकाणी नायलॉन मांजा विक्री केला जात आहे. त्यामुळे पोलिसांकडून ठोस कारवाई कधी केली जाणार, जेणेकरून नायलॉन मांजा विक्री थांबवता येईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


ग्रामीण पोलिसांकडून 23 पथकाची स्थापना...


नायलॉन मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्या दुकानदारांच्या विरोधात ग्रामीण पोलिसांकडून देखील विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्हयातील सर्व 23 पोलीस ठाण्यांमध्ये नायलॉन मांजा विरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच नायलॉन मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्या व्यक्तीबद्दल कोणतेही माहिती असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 112 या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती देण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहेत. मात्र असे असले तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी नायलॉन मांजा विक्री सुरूच असल्याचे समोर येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


काय सांगता! रेड्याच्या वाढदिवसाला शहरभर होर्डिंग; 700 पाहुण्यांना जेवणाचे आमंत्रण अन् ड्रायफ्रुटचा केकही