Nanded News: मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या (Marathwada Teacher Constituency Election) अनुषंगाने मराठवाड्यात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या काळात निवडणुक आयोगाच्या परवानगी शिवाय मोर्चा किंवा निदर्शने करण्यास परवानगी नसते. मात्र असे असतांना देखील नांदेडमध्ये जात वैधता प्रमाणपत्राच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर 5 जानेवारी रोजी महादेव कोळी समाजाच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी मोर्चाच्या आयोजकांसह 72 जणांविरुद्ध जमावबंदीचा आदेश धुडकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण... 


नांदेडच्या हदगाव तालुक्यातील खरटवाडी येथील वैद्यकीय शिक्षण घेणारी विद्यार्थिनी डॉ. मयुरी श्रीकृष्ण पुंजरवाड हिला जात वैधता प्रमाणपत्र समितीने महादेव कोळी जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास नाकारले होते. घरात देव देवतांची पूजा करता म्हणून, प्रमाणपत्र देण्यास जात वैधता प्रमाणपत्र समितीने नकार दिल्याने मयुरी पुंजरवाड हिच्या वैद्यकीय शिक्षणास खोडा आला असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर घरातील देवदेवतांमुळे जर शिक्षणापासून वंचित राहावे लागत असेल तर महादेव कोळी जमातीतील लोकांनी घरातील सर्व देवतांचे फोटो जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पाच जानेवारी रोजी नांदेड शहरात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत देव देवतांची फोटो परत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 


जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्च्याची परवानगी जिल्हाधिकारी यांनी नाकारली होती. त्यामुळे परवानगी नसल्याने आंदोलकांनी आयटीआय चौकातच आंदोलन केले. दरम्यान आचारसंहितेच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश धुडकावल्याने पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अहमद खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मोर्चाचे आयोजक तथा आदिवासी विकास कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष परमेश्वर गोणारे यांच्यासह बहुजन समाज पार्टीचे प्रदेश प्रभारी मनीष कावळे, संजना श्रीकृष्ण पुंजरवाड, मयुरी श्रीकृष्ण पुंजरवाडसह 72 जणांविरुद्ध जमावबंदी आदेश धुडकवल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


विनापरवानगी मोर्चा काढण्यास मनाई...


मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची 30 जानेवारीला निवडणूक पार पडत असल्याने मराठवाड्यात सद्या आचारसंहिता लागू आहे. याबाबत 5 जानेवारीला निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,बीड, नांदेड, हिंगोली,परभणी, लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यात सद्या आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे या काळात उपोषण, धरणे आंदोलन, मोर्चे, निदर्शने करण्यास मनाई असते. सद्या नांदेड जिल्ह्यात देखील जिल्हाधिकारी यांच्याकडून जमावबंदीचे आदेश काढण्यात आले असून, विनापरवानगी कोणलाही मोर्चे काढता येत नाही. पण असे असतांना देखील महादेव कोळी समाजाच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांसह मोर्चेकरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मराठवाड्यात आचारसंहिता लागू! शिक्षक मतदारसंघासाठी 30 जानेवारीला मतदान