Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाता-जाता नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे नामांतराचा मुद्दा आणखीनच तापताना पाहायला मिळत आहे. त्यातच एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनी नामांतराला विरोध केला आहे. कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचं नामांतर होऊ देणार नाही, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा जलील यांनी दिला आहे. मंगळवारी जलील यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, यावेळी काही महत्वाचे ठराव घेण्यात आले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले होते. ज्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान याच निर्णयाला आता विरोध होतांना पाहायला मिळत आहे. एमआयएमसह अनेक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. तर नामांतराच्या विरोधात खासदार जलील यांनी मंगळवारी एक बैठक बोलावली होती. या बैठकीत एमआयएम, राष्ट्रवादी, काँग्रेससह अनेक संघटनेच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळाले.
काय म्हणाले जलील...
जगभरात औरंगाबाद शहराची ऐतिहासिक ओळख आहे. परंतु केवळ हिंदुत्व हा मुद्दा दाखवण्यासाठी व बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे कुणाच्याही आजोबांच्या इच्छेसाठी औरंगाबादचं नामांतर होऊ देणार नाही. यासाठी कायदेशीर लढाई उभारली जाईल, तसेच गरज पडल्यास रस्त्यावर सुद्धा उतरू असा इशारा जलील यांनी दिला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला आमचा विरोध नाही, आम्ही त्यांचा आदर करतो, संभाजी महाराजांचे नाव द्यायचे असेल तर ते पुणे शहराला देऊन दाखवा, असेही जलील म्हणाले.
राष्ट्रवादी-काँग्रेससचे नेत्यांची हजेरी...
औरंगाबादच्या नामांतराच्या निर्णयाला विरोध करत यापूर्वीच राष्ट्रवादी-काँग्रेससच्या काही नेत्यांकडून राजीनामे देण्यात आले होते. त्यांनतर जलील यांनी बोलावलेल्या बैठकीत सुद्धा राष्ट्रवादी-काँग्रेससचे अनेक पदाधिकारी हजर असल्याचे पाहायला मिळाले. आमच्यासाठी पक्ष महत्वाचा नसून, जनतेचा विषय महत्वाचा असल्याने आम्ही नामांतराच्या विरोधात असल्याच काँग्रेससचे अफसर खान म्हणाले. तर जाणीवपूर्वक शहराचे नामांतर करण्याचा प्रयत्न केला जात असून, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे एकत्र लढण्याची गरज असल्याच राष्ट्रवादीचे नेते इलियास किरमाणी म्हणाले.