Marathwada News: संतांची भूमी अशी मराठवाड्याची ओळख. मात्र या भूमीमध्ये गेल्या काही दशकांपासून सिमी, आयसिस या दहशतवादी संघटना आणि आता पीएफआय सारख्या कट्टरपंथीय संघटनेवर झालेल्या कारवाईमुळे मराठवाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गुरुवारी एनआयए आणि एटीएसच्या पथकाने केलेल्या कारवाईत मराठवाड्यातील 10 जणांना ताब्यात घेतले आहे. ज्यात औरंगाबाद, जालना आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. 


मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या पीएफआय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर एटीएसने छापेमारी करत अटक केली. या कारवाईत औरंगाबादमधून चौघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ज्यात पीएफआय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख नासेरचा सुद्धा समावेश आहे. सोबतच जालना येथून एक आणि नांदेड भागातून 5 पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मात्र गंभीर आहे. कलम 121A म्हणजेच देशाविरुध्द युध्द पुकारणे, कलम 153A म्हणजेच जात, धर्म समुहात तेढ निर्माण करणे, कलम 109 म्हणजेच एखांद्या गुन्हयाला मदत करणे, कलम 13(1)(बी) म्हणजेच प्रतिबंधित कर्त्य करणे, कलम 120B  म्हणजेच कट रचणे, असे आरोप पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर ठेवण्यात आले आहे. 


एटीएसकडून औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेली पीएफआयचे पदाधिकारी आहे तरी कोण पाहू यात...
 



  • परवेज खान मुजम्मील खान, (वय 26 वर्षे, रा.बायजीपुरा औरंगाबाद) याला अटक करण्यात आली आहे. 
    परवेज खान हापीओपीचे काम करतो. तसेच गेल्या काही वर्षांपासून तो पीएफआय संघटनेचे काम करतो.

  • मौलाना इरफान मिल्ली (वय 37 वर्षे, रा. किराडपुरा औरंगाबाद) याला सुद्धा एटीएसने अटक केली आहे. इरफान हा मौलवी असून मदरशामध्ये अरबी आणि उर्दूची शिकवणी घेतो. त्याला दोन बायका असून पाच अपत्ये आहेत.

  • सय्यद फैजल सय्यद खलील (वय 28 वर्षे, रा. मेहमूद पुरा औरंगाबाद) याला सुद्धा पथकाने अटक केली आहे. तर फैजलचे शहरातील नॅशनल कॉलनीत अत्तर विक्रीचे दुकान आहे. गेल्या चार वर्षापासून तो पीएफआय या संघटनेत सक्रिय काम करतो.

  • शेख नासेर शेख साबेर उर्फ नदवी ( वय 37, रा. बायजीपुरा, औरंगाबाद) याला सुद्धा एटीएसने शुक्रवारी अटक केली आहे. तर तो टेलर काम करतो. 


यापूर्वी मराठवाड्याची चर्चा...


विशेष म्हणजे यापूर्वी देखील मराठवाड्यात देशद्रोही कारवाया करणाऱ्यांचे मोठे जाळे असल्याचे समोर आले आहे. ज्यात 9 मे 2006  रोजी वेरूळजवळ एका टाटा सुमोत मोठा शस्त्रसाठा सापडला. ज्यात 16  एके 47  रायफल, 3200  काडतूस, 62 मॅगझिन, 43 किलो आरडीएक्स, 50 हँडग्रेनेड आढळून आले होते. तर 2012 मध्ये रोजाबाग येथे एटीएसने दोन अतिरेक्यांचे एन्काउंटर केले होते. त्यानंतर 21 जानेवारी 2019 रोजी औरंगाबाद येथून 8 जणांना एटीएसकडून अटक करण्यात आली होती. आता 22 सप्टेंबर 2022 रोजी  पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.


काही मुस्लीम संघटनांचा पीएफआयला पाठींबा 


यापूर्वी सिमी सारख्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर सेलचे जाळ औरंगाबादपर्यंत पोहचल्याचे पाहायला मिळाले होते. त्यातच आता देशविरोधी कट रचण्याचा आरोप असलेल्या पीएफआय संस्थेची सूत्रे देखील औरंगाबादमधून हलवली जात असल्याचे समोर आल्याने मराठवाडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकीकडे मराठवाड्याची अशी ओळख असली तरी, पीएफआयचे अटक करण्यात आलेले सर्व तरुण हे निर्दोष असल्याचा दावा अनेक मुस्लीम संघटनांनी केला आहे. 


हिंदू कट्टर वाद्यांचे देखील मराठवाडा केंद्रस्थान 


एवढेच नाही तर हिंदू कट्टर वाद्यांचे देखील मराठवाडा हे केंद्रस्थान बनलेल आपण पाहिलं. दाभोळकर, कलबुर्गी यांच्या हत्याचे धागेदोरे देखील मराठवाड्यातच मिळाले. त्यामुळे मराठवाड्यात वाढत असलेली धार्मिक कट्टरता मराठवाड्याची ओळख बदलू पाहते का हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. संतांची भूमी अशी ओळख मराठवाड्याची बदलू नये आणि यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.