Aurangabad News: सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईबाबत पत्र काढले असून, ज्यात वैजापूर आणि पैठण तालुका मदतीपासून वगळण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप असून, नुकसानभरपाई न मिळाल्यास जायकवाडी धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी (Jayaji Suryavanshi) यांनी दिला आहे.
सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने पैठणसह औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. यावेळी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. प्रशासनाकडून या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून एकूण 268 कोटी 12 लाख 71 हजार 616 रुपये वितरित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने पत्र काढले आहे. मात्र यातून पैठण आणि वैजापूर या दोन्ही मतदारसंघाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे पैठण येथील शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर याचवेळी राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटना यांच्याकडून देखील रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पैठण तालुका औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांचा मतदारसंघ आहे.
शेतकऱ्यांची आज बैठक...
नुकसानभरपाईच्या मदतीच्या यादीत पैठण तालुका वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी आज तालुक्यातील शेतकऱ्यांची पैठणच्या जांभूळ बन येथे बैठक होत आहे. यावेळी नुकसानभरपाईसह शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येत असल्याच्या मुद्यावर चर्चा होणार आहे. तसेच पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत शेतकरी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
लवकरच मदत मिळणार: भुमरे
नुकसानभरपाईच्या मुद्यावर प्रतिक्रिया देतांना पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले की, पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार नसल्याचे काही गैरसमज पसरवण्यात आले आहे. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील कोणताही तालुका वगळण्यात आलेला नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा एकूण 95 कोटी 44 लाख रुपयांचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला असून, लवकरच मदत मिळणार असल्याचे भुमरे म्हणाले.
जयाजी सूर्यवंशी पुन्हा 'ऍक्टीव्ह'
पुणतांबा येथील शेतकरी संपावरून झालेल्या आरोपानंतर शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी गायब झाले होते. कधीकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडणारे जयाजी यांचे आंदोलन देखील होतांना दिसत नव्हते. अधूनमधून आपली भूमिका मांडत असतांना जयाजी यांचे सार्वजनिक आंदोलन बंद झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जयाजी सूर्यवंशी यांनी आंदोलनाची हाक दिली असून, त्यानिमित्ताने जयाजी हे पुन्हा 'ऍक्टीव्ह' झाल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.