Aurangabad News: शाळेत येऊन एका अनोळखीने मुलीला नावाने हाक मारत 'तुला घ्यायला पप्पांनी मला पाठविले आहे. चल, आपण घरी जाऊ, असे म्हणत नऊ वर्षांच्या मुलीचा हात धरून अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी औरंगाबाद सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती, तर पोलीस दलही कामाला लागले होते. पण हा सर्व प्रकार गैरसमजुतीतून झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 


औरंगाबादच्या सिडको परिसरातील जिगीषा इंटरनॅशनल स्कूलमध्ये एका नऊवर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार 23 नोव्हेंबरला घडला होता. त्यानंतर पोलिसांनी अनिल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. त्यांची मुलगी आराध्या हिच्या अपहरणाचा एकाने प्रयत्न केला, अशी त्यांची तक्रार होती. पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. शाळेच्या गेटवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आनंद भगत यांना शोधून आणले.


आनंद भगत यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता, आनंद भगत यांचा मुलगाही जिगीष शाळेतच शिकत असल्याचे समोर आले. दरम्यान 23 नोव्हेंबरला जिगीषा शाळेच सहल गेली होती. सायंकाळी पाच वाजता सहल परतली. तेव्हा भगत आपल्या मुलाला घेण्यासाठी शाळेत गेले होते. विशेष म्हणजे भगत यांच्या घराशेजारी राहणारे भगवान खिल्लारे यांची मुलगी देखील त्याच शाळेत शिकत आहे. त्यामुळे शेजारी भगवान खिल्लारे यांनी त्यांच्या मुलीला देखील घेऊन येण्यास भगत यांना फोनवरून सांगितले.


गैरसमजुतीतून सर्व प्रकार घडला.


भगत शाळेत गेले तेव्हा ते दारूच्या नशेत होते. दरम्यान त्यांनी खिल्लारे यांच्या मुलीला नावाने हाक मारली. पण शाळेच्या स्टाफने तक्रारदार सोनवणे यांच्य मुलीला आवाज दिल्याचे सांगून तिला भगतकडे पाठविले. भगत दारूच्या नशेत असल्याने त्यांनी सोनवणे यांच्या मुलीचा हात धरून तुझ्या वडिलांनी घेण्यासाठी पाठवले असल्याचं सांगत तिला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी सर्व गडबड झाली आणि गैरसमजुतीतून सर्व प्रकार घडला. 


शहरात खळबळ उडाली... 


मागील काही दिवसांपासून मुलं पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा सोशल मीडियावर सतत फिरत होत्या. काही ठिकाणी तर यावरून मारहाणीचे प्रकार देखील समोर आले होते. अशातच एका शाळेत मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी शहरात पसरताच एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी घटना गांभीर्याने घेत अवघ्या काही तासात सर्व प्रकरणा समोर आणले.