Abdul Sattar On Guwahati Tour: राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे गटाचे आमदार शनिवारी कुटुंबासह गुवाहाटीमध्ये (Guwahati) कामाख्या मातेच्या (Kamakhya Mata Mandir) मंदिरात दर्शनासाठी गेले आहेत. मात्र याचवेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांसह (Abdul Sattar) काही आमदार मात्र या दौऱ्यापासून दूर असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे यावरून सत्तार नाराज असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. तर याच प्रश्नावर उत्तर देतांना 'मी नाराज नसल्याचं' अब्दुल सत्तार म्हणाले आहे. 


कामाख्या मातेच्या मंदिरात दर्शनासाठी न गेल्याने तुम्ही नाराज असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, 'नाशिक येथील कृषी प्रदर्शनाला येणे निश्चित होते. त्यामुळेच गुवाहाटीला जाऊ शकलो नाही. मी अजिबात नाराज नाही. आमचा मुख्यमंत्र्यांवर पूर्णपणे विश्वास आहे आणि आमचं सगळं चांगलं सुरू असल्याचा' दावा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला.


दर्शनासाठी कधी तरी जाईन...


नाशिक येथील कृषिथॉन प्रदर्शनाला मंत्री सत्तार यांनी हजेरी लावली. त्याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कामाख्या देवीला जाण्यासाठी आजचाच दिवस आहे, असे नाही. नंतर कधी तरी जाईन. मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र गेल्यासारखेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या मनगटात एवढा जोर आहे की, ते दुसऱ्याला भविष्य विचारण्यासाठी हात दाखवणार नसल्याचे सांगत मंत्री सत्तार यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावले.


अजित पवारांनी बारामतीचा रेडा घेऊन गुवाहाटीला जावं


कामाख्या देवीला रेड्यांचा बळी दिला जातो, आता कोणत्या रेड्याचा बळी दिला जाणार अशी टीका अजित पवारांनी (Ajit Pawar) केली असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, शेवटी रेड्याची बळी देणं धार्मिक भावना आहे. त्यासाठी अजित पवारांनी स्वतः जायला पाहिजे आणि सोबत एखांदा बारामतीचा रेडा घेऊन जायला पाहिजे असा टोला सत्तार यांनी लगावला. अजित पवारांनी बळी द्यायला पाहिजे त्यात काय, चांगलंच आहे. ज्यांना-ज्यांना वाटत असेल की रेड्याचा बळी द्यावा त्यांनी आपल्याच गावाचा रेडा घेऊन जायला पाहिजे असेही सत्तार म्हणाले. 


15  दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मदत...


राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र असे असतांना सरकारकडून नुकसानभरपाई दिली जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरच बोलतांना सत्तार म्हणाले की, अवकाळी पाऊस, गारपीट, ढगफुटीसारख्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुमारे 12  हजार कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे. तर येत्या 15  दिवसांमध्ये सर्व मदतीचे वाटप केले जाईल, असे त्यांनी सांगितले.


Ambadas Danve: कट्टर हिंदुत्वामुळे सत्तारांनी कामाख्या देवीचं दर्शन टाळलं; अंबादास दानवेंचा खोचक टोला