Aurangabad News: कोट्यवधी रुपये खर्च करून आणि वेगवेगळ्या योजनांची घोषणा करूनही हजारो बालके कुपोषणाच्या (Malnutrition) फेऱ्यात अडकली असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याला शून्य कुपोषणाचा स्तर गाठता आलेला नाही. धक्कादायक म्हणजे नुकत्याच झालेल्या तपासणीत जिल्ह्यात तब्बल साडेसात हजारांवर बालके कुपोषणाच्या फेऱ्यात अडकल्याचे दिसून आले आहे.
बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार पुरवठा केल्या जातो तसेच अंगणवाडीत दर महिन्याला या बालकांची वजन व उंचीची नोंद घेत, त्यांच्या वाढीवर देखरेख ठेवली जाते. यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना देखील राबवल्या जातात. ज्यात बालकांच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते. विशेष म्हणजे याबाबत सर्व माहिती पोषण ट्रॅकर अॅपद्वारे प्रशासन आणि शासनापर्यंत पोहचवली जाते. मात्र असे असतांना देखील एका तपासणीत जिल्ह्यात तब्बल साडेसात हजारांवर बालके कुपोषणाच्या फेऱ्यात अडकल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
अशी राबवली मोहीम
17 ते 30 नोव्हेंबरदरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष मोहीम राबविली होती. या मोहीमेसाठी 305 पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने वेगवेगळ्या अंगणवाडीला भेटी दिल्या. या भेटीदरम्यान पोषण आहारसोबतच बालकांची तपासणी करण्यात आली. ज्यात त्यांच्या वजन व उंचीच्या नोंदीही घेण्यात आल्या होत्या. या मोहिमेनंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात गंभीरपणे तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 1202 बालके, तर मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 6416 बालके आढळून आली आहेत.
एकूण आकडेवारी...
- औरंगाबाद तालुक्यात एकूण 1225 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 543 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 682 बालके आहेत.
- गंगापूर तालुक्यात एकूण 1413 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 587 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 826 बालके आहेत.
- कन्नड तालुक्यात एकूण 703 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 430 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 273 बालके आहेत.
- खुलताबाद तालुक्यात एकूण 332 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 78 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 284 बालके आहेत.
- पैठण तालुक्यात एकूण 802 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 371 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 431 बालके आहेत.
- फुलंब्री तालुक्यात एकूण 778 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 90 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 688 बालके आहेत.
- सिल्लोड तालुक्यात एकूण 1123 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 787 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 336 बालके आहेत.
- सोयगाव तालुक्यात एकूण 641 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 101 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 540 बालके आहेत.
- वैजापूर तालुक्यात एकूण 598 कुपोषित बालके असून, ज्यात तीव्र कुपोषित (सॅम) श्रेणीत 126 तर तीव्र कुपोषित (मॅम) श्रेणीत 472 बालके आहेत.
प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना
दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कुपोषणाची परिस्थिती पाहता जि.प. महिला व बाल विकास विभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहे. तर तपासणी मोहिमेत आढळलेल्या सॅम आणि मॅम बालकांसाठी 84 दिवसांचा कृती कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे आगामी तीन महिन्यांत या बालकांना कुपोषणातून बाहेर काढून सामान्य श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याची माहिती जि.प. महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले यांनी माध्यमांना बोलतांना दिली आहे.