Aurangabad News: औरंगाबाद शहरात आज आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्यावतीने भाजप नेते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. भडकल गेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आंबेडकरवादी विविध संघटनांकडुन हा निषेध मोर्चा काढण्यात आला. भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात येत असून अपमान करणाऱ्या नेत्यांना भाजप पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. तसेच महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीच एक निवेदन यावेळी विभागीय आयुक्तांना देण्यात आला आहे. तर यानंतर देखील कारवाई झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापुरुषांच्या अवमानाची शृंखला सतत चालू आहे. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, भाजप आमदार प्रसाद लाड, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी बेताल वक्तव्ये करून छत्रपती शिवराय, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले तथा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल केलेल्या मानहानीकारक वक्तव्याचा निषेध म्हणून संबंध महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांच्या मनात प्रचंड चीड आहे. सामाजिक स्वास्थ बिघडविणे हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा असून, यामुळे देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाला असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे.
राज्यात असंतोष निर्माण होईल
तर भाजपाच्या वाचाळ वीरांची वक्तव्ये इतकी शिगेला पोहचली आहेत की, त्यांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा चालवल्या असं अवमानकारक व जातीवाचक वक्तव्य केलं आहे. त्याच्या निषेधार्थ संबंध महाराष्ट्रभर आंदोलनं झाली व सरकारने आंदोलकर्त्यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली आहे. वरील जातीय द्वेषाने पछाडलेल्या लोकांवर कारवाई न झाल्यास राज्यात असंतोष निर्माण होईल असेही यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा...
तर याचवेळी चंद्रकांत पाटील याच्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल जातीय द्वेषातून अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
आंदोलकांच्या मागण्या...
- चंद्रकांत पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी.
- मनोज गरबडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.
- आंबेडकरी अनुयायांना घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्या राम कदम यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
- हेतूत: समतावादी महापुरुषांचा अवमान करणाऱ्या भाजपा नेत्यांच्या विरोधात महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी महापुरुष अवमान कायदा व भारतीय दंड संहिता कलम 506 (2) नुसार कारवाई व्हावी.
- वरील मागण्यांचा राज्य सरकारने सकारात्मक विचार करून भाजपा नेत्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन या महाराष्ट्रात उभारले जाईल याची नोंद घ्यावी.