SSC-HSC Board Exam: यापुढे दहावी व बारावीच्या परीक्षेत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काव्यतिरिक्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे अतिरिक्त 50 रुपये द्यावे लागणार आहेत. फेब्रुवारी-मार्च 2023 च्या परीक्षेपासून हे छाननी शुल्क सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी आकारले जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या या फतव्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
शिक्षणाधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत सवलतीच्या अतिरिक्त गुणांचे प्रस्ताव शाळा तसेच विभागीय शिक्षण मंडळाकडे येत असतात. या सर्व प्रस्तावांची छाननी करावी लागते. त्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधितांशी पत्रव्यवहार करून त्रुटींची पूर्तता करावी लागते. त्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर रोजंदारी कर्मचारी नेमावे लागतात. या कामासाठी लागणारा वेळ, श्रम याचा विचार करून छाननी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. असे परीक्षा मंडळाकडून सांगण्यात आले असल्याचे वृत्त 'लोकमत'ने दिले आहे.
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाऱ्या तसेच लोककला, क्रीडा, एनसीसी, स्काउट व गाइड प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याची ही योजना शिक्षण मंडळाकडून राबविली जाते. यंदाच्या परीक्षेपासून शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थ्यांकडून 50 रुपये चलनाद्वारे किंवा रोखीने घ्यावेत व ते विभागीय मंडळ स्तरावर प्रस्ताव सादर करावेत, शिक्षण मंडळाच्या या शिफारशीला परीक्षा समितीनेदेखील मंजुरी दिली आहे. तर परीक्षेच्या प्रस्तावासोबतच हे छाननी शुल्क स्वीकारावे. छाननी शुल्क न आकारता किंवा कमी शुल्क आकारून प्रस्ताव स्वीकारण्यात येऊ नयेत, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील मंडळाने केल्या आहेत.
परीक्षांबाबत मोठा बदल
यावर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2023 या कालावधीत होणार असून, दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहे. मात्र आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. कारण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होमसेंटर सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी दिलेला अर्धा तासाचा वाढीव वेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने दिली आहे. सोबतच या परीक्षा पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित होईल. तसेच 80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी मिळणार नाही. 60-40 गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही. तसेच यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. ( गेल्यावेळी 25% अभ्यासक्रम वगळला होता) मात्र, दिव्यांगांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI