Aurangabad Measles Disease Update: मुंबईप्रमाणेच आता औरंगाबाद शहरात देखील गोवर संशयित बालकांची संख्या सातत्याने वाढत आहे. सोमवारी यात आणखी नऊ संशयित रुग्णांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गोवर आजाराच्या (Measles Disease) संशयित बालकांची संख्या 54  झाली आहे. त्यापैकी चार बालकांचा चाचणी अहवाल गोवर पॉझिटिव्ह आला असून, ग्रामीण भागातील एका बालकाला देखील गोवरची लागण झाल्याने जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच झाली आहे. 


मुंबई, भिवंडीपाठोपाठ आता औरंगाबाद शहरातही गोवरचा फैलाव होत आहे. सोमवारी गोवर आजाराची नऊ संशयित बालके आढळून आली आहे. ज्यात मसनतपुर, मध्यवर्ती जकात नाका परिसर, आलमगीर कॉलनी, संजयनगर ( कैसर कॉलनी आरोग्य केंद्रा अंतर्गत), बुध्दविहार (नक्षत्रवाडी आरोग्य केंद्रा अंतर्गत) या ठिकाणी प्रत्येकी एक बालक, तर मल्हार चौक (विजयनगर आरोग्य केंद्रा अंतर्गत) चार संशयित बालके आढळून आली आहे. आरोग्य विभागाकडून आता या भागात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 


बालकांच्या रक्तांचे नमुने प्रयोगशाळेत पाठीवले...


सोमवारी शहरात आढळून आलेल्या या सर्व बालकांच्या रक्ताचे नमुने लगेचच मुंबई येथील हाफकिनच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या नऊ बालकांमुळे गोवर संशयित बालकांची संख्या आता 54 झाली आहे. हाफकिन प्रयोगशाळेला महापालिकेने आतापर्यंत 42 बालकांच्या रक्तांचे नमुने पाठवले आहेत, त्यापैकी तेरा नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. तेरा बालकांमधून चार बालके गोवर पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे, अन्य बालकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर आता आणखी 9 बालकांच्या रक्तांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. सद्या तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 


शासकीय रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था


शहरात आतापर्यंत चार रुग्ण गोवर पॉझिटिव्ह आढळून आल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाले आहेत. तर गोवरची लागण झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी घाटीत स्वतंत्र व्यवस्था व्यवस्था करण्यात आली आहे. शासकीय घाटीतील वॉर्ड क्रमांक 4 हा लसीकरण आणि गोवर रुग्णांसाठी सुसज्ज ठेवण्यात आला आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी सोमवारी गोवर संदर्भात घाटीतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. संस्थेमधील व्हीआरडीएल लॅबमध्ये गोवर चाचणी उपलब्ध केली असून 6 ते 8 तासांत चाचण्यांचे निदान अहवाल रुग्णांना उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. 


आणखी महत्वाच्या बातम्या...


मोठी बातमी! औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू