Aurangabad Accident: औरंगाबादच्या इसारवाडी फाट्याजवळील औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावर आज सकाळी 6 वाजता भीषण अपघात झाला असून, ज्यात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर यात मृत महिलेचा पती गंभीर जखमी झाला आहे. एसटी बस आणि बैलगाडीचा हा अपघात झाला असून, ज्यात बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कलीयाबाई गोविंद गिरे आणि आर्जुन गोविंद गिरे असे मृत आई-मुलाचं नाव आहे. तर गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. हे सर्व नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मानिकपुंद येथील रहिवासी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याच्याजवळ असलेल्या इंडियन हॉटेलजवळ गंगापूर आगाराच्या बसने (क्रमाक एमएच 14 बीटी 2500) ऊस तोडीला जाणाऱ्या बैलगाडीला जोराची धडक दिली. बसचा वेग अधिक असल्याने बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर या अपघातात बैलगाडीत बसलेल्या आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच बैलगाडी चालवत असलेले मृत महिलेचे पती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव करत जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.
घटनास्थळी वाहतूक ठप्प...
औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यात सकाळी औरंगाबाद,अहमदनगर ते पुणे असे प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते. त्यामुळे सकाळी बस आणि बैलगाडीचा अपघात झाल्यावर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या गाड्यांच्या दूरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत आई-मुलाचा मृतदेह रुग्णालयात पाठवत, जखमीला उपचारासाठी रुग्णवाहिकेने पाठवून रस्ता मोकळा केला. त्यामुळे काही वेळात रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा सुरळीत सुरु झाला आहे.
आणखी एक अपघात...
सकाळी 6 वाजता औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी फाट्याजवळ अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच याच महामार्गावर शिवना नदीच्या पुला जवळ पुन्हा एक अपघात झाल्याची देखील बातमी समोर येत आहे. एक चारचाकी गाडी थेट पुलावर जाऊन धडकली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यात तीन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. रुख्मिण राजपूत ( वय 44 वर्षे), प्रिन्सेस राजपूत (वय 8 वर्षे) आणि चतुरसिंग राजपूत (वय 50 वर्षे) असे जखमींचे नावं आहेत. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चुराडा झाला आहे.