Jalna News: जालन्यातील घनसावंगी येथील स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड संचलित संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज होणार आहे. तर 10 व 11 डिसेंबर रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लातूर येथील सुप्रसिध्द साहित्यिक शेषराव मोहिते, मावळते संमेलनाध्यक्ष तथा साहित्यिक बाबू बिराजदार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार शिवाजी चोथे यांची उपस्थिती राहणार आहे.


आज ग्रंथदिंडी ग्रंथ प्रदर्शनचे उद्घाटन सकाळी दहा वाजता मावळते संमेलनाध्यक्ष बाबू बिराजदार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. कवी संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयराम खेडेकर हे राहणार आहे. सूत्रसंचालन नांदेड येथील देविदास फुलारी करणार असून. समाधान इंगळे औरंगाबाद याच्यासोबत दीडशेहून अधिक कवी या कवी संमेलनात सहभाग नोंदवणार आहेत. या संमेलनाचा महाराष्ट्र व मराठवाड्यातील साहित्यप्रेमींनी आनंद घ्यावा. या संमेलनास जिल्ह्यातील साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव चोथे व संत रामदास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र परदेशी यांनी केले.


आज दिवसभरातील कार्यक्रम...


आजपासून मराठवाडा साहित्य संमेलनाला सुरवात होणार असून, आज आणि उद्या असे दिवसीय संमेलन असणार आहे. आज सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी, 10 वाजता ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन, दुपारी अडीच वाजता कथाकथन तसेच नवलेखकांचे लेखन समाजमाध्यमांच्या आवर्तात अडकले आहे, या विषयावर परिसंवाद होणार आहे. तसेच मी का लिहिते, ती का लिहिते या विषयावरही याच वेळेत परिसंवाद होणार आहे. तर 4 45  वाजता संत साहित्याची उपेक्षा समाज चारित्र्यासाठी हानिकारक आहे या विषयावर परिसंवाद होणार आहे. तसेच आमचे कवी, आमची कविता हा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात वाजता कविसंमेलन रंगणार आहे.


यांची राहणार उपस्थिती 


महादंबा साहित्य नगरीच्या संत रामदास कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित या साहित्य संमेलनास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रमोद येवले माजी खासदार चंद्रकांत खैरे, खा. संजय जाधव, आमदार बबनराव लोणीकर, आमदार जिल्हाधिकारी विजय राठोड, घनसावंगीचे नगराध्यक्ष पांडुरंग कथले, योगीराज कैलास महाराज हेमके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.