Chandrakant Patil: शाळा चालू करण्यासाठी फुले, आंबेडकरांनी भीक मागितली. तुम्ही सरकारवर अवलंबून का राहता? असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यावर आता विरोधकांकडून टीका होत आहे. तर दुसरीकडे यावर पाटील यांनी खुलासा केला आहे. 'मी महापुरुषांबद्दल आदरच व्यक्त केला' असल्याचा खुलासा पाटील यांनी केला आहे. 


यावेळी बोलतांना पाटील म्हणाले की, मी महापुरुषांबद्दल आदरच व्यक्त केला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरु केल्या, मात्र यासाठी त्यांनी भिक मागितली असे माझे विधान होते. आता भिक म्हणजे आजच्या काळातील सीआरएस फंड किंवा त्याला आपण देणगी म्हणू शकतो. माझ्या वक्तव्याचं वारकऱ्यांनी स्वागत केले असेही पाटील म्हणाले.  तर पुढे बोलतांना ते म्हणाले की, आता प्रत्येक गोष्टीला शेंडा नाही, बोडका नाही म्हणून त्यावर वाद निर्माण करण्याचे जे चाललं आहे, त्याचा जे कोणी ही क्लिप आयकली तर ते म्हणेल या लोकांचा काय चालले आहे.  


काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील...


पैठण येथे भाषण करतांना पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगल्या कामासाठी पैसे देत आहेत. मात्र सरकारवर अवलंबून का राहत आहे. या देशामध्ये शाळा कोणी सुरु केल्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केल्या. यावेळी त्यांना शाळा सुरु करतांना सरकराने अनुदान नाही दिले. शाळा चालवत आहे, मला पैसे द्या म्हणून त्यावेळी त्यांनी लोकांकडे भिक मागितली. त्या काळात दहा-दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी देणारे आहेत. त्यामुळे कंपन्यांनी सामाजिक कामासाठी दोन टक्के पैसे खर्च करणे गरजेचे आहे. मंदिर आपण उभं करतो, तेव्हा सरकारकडे थोडी पैसे मागतो असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. 


काँग्रेसकडून घोषणाबाजी 


चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगाबादच्या सरस्वती भवन महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तर चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचे यावेळी निषेध देखील करण्यात आला. तर यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले आहे. त्यामुळे काही वेळेसाठी याठिकाणी गोंधळ उडाला होता. 


विरोधकांकडून टीका... 


चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाटील यांच्यावर टीका केली आहे. तर यासर्वांवर चंद्रकांत पाटील यांनी देखील खुलासा केला आहे. 


शाळा चालू करण्यासाठी फुले, आंबेडकरांनी भीक मागितली, तुम्ही सरकारवर अवलंबून का राहता?: चंद्रकांत पाटील