Aurangabad News: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस अधिकच पेटताना दिसत असून, कोल्हापूर आणि बेळगाव सीमाभागात मराठी-कानडी वाद आता चांगलाच चिघळला आहे. अशात दोन्ही राज्यांत सीमावाद पेटलेला असताना व दोन्ही राज्यांतील नागरिक एकमेकांकडे अविश्वासाने बघत असतान एका मराठी डॉक्टरने कानडी रुग्णावर माणुसकीच्या निरपेक्ष भावनेतून उपचार करून त्याला बरे करत सामाजिक सौहार्दाचे वेगळे उदाहरण घालून दिले आहे. औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयातील ही घटना असून, या डॉक्टरांनी कानडी रुग्णावर तब्बल 27 दिवस उपचार करून बरे करत त्याला डिस्चार्ज दिला आहे. डॉ. बाळासाहेब शिंदे असे या डॉक्टराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 3 नोव्हेंबरला रात्री आठ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील प्रवेशद्वारासमोर सुमारे 70 वर्षीय निराधार कानडी वृद्ध थंडीत कुडकुडत असल्याचे डॉ. बाळासाहेब शिंदे यांना दिसले. मळकट कपडे, दाढी वाढलेली अशा स्थितीतील भटकत असल्याने वृद्धाची प्रकृती खालावली असल्याचे डॉ. शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने व्हीलचेअर बोलावून रुग्णास उपचारासाठी नेले. उपासमारीमुळे त्याला चालताही येत नव्हते. अन् काही विचारल्यावर सांगताही येत नव्हते. डॉ. शिंदे यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार सुरू केले. त्याचे पाय हलत नसल्याने विविध तपासण्यात केल्या. तब्बल 27 दिवस उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती ठणठणीत झाली.
कानडी भाषेमुळे अडचण झाली, पण...
कानडी असलेल्या या वृद्धास मराठी बोलता येत नव्हते. तो वेगळ्याच भाषेत बोलत होता. त्यामुळे उपचार करताना डॉक्टरांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. तो कानडी भाषेत बोलत असल्याचे तेजस्विनी तुपसागर यांच्या लक्षात आले. त्यांनी कानडी भाषा बोलता येणाऱ्या विजयश्री गडाख यांना बोलवून त्यांना बोलते केले. आपल्या भाषेत कोणीतरी बोलतंय हे पाहून त्यांना आनंद झाला. तीन वर्षापूर्वी मुलाने औरंगाबादेत आणले अन् रेल्वेस्टेशनवर सोडून निघून गेला. कर्नाटक राज्यातील बाचाडी, बसवकल्याण येथील रहिवासी असून राजू रामगौडा नाव असल्याचे त्याने सांगितले. पैसे कमावून आणत नसल्याने मुलाने मला इथे आणून सोडले. पत्नी, मुलगा, सून, मुलगी असल्याचे रामगौडा यांनी सांगितले. घरच्यांची आठवण तर येते मात्र, पोराने असे केल्याने घरी कसे जावे असा उलटप्रश्न करत रामगौडा यांनी सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडले.
रक्ताची नाती दुरावत आहे....
रामगौडा यांची कहाणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह इतर रुग्णांना समजल्यानंतर सर्वांनीच त्यांची काळजी घेण्यास सुरूवात केली. या काळात सुमित दाभाडे, रवी मगरे, नितीन रनभरे, साहेबराव केळोदे, तेजस्विनी तुपसागर, आयान बेग यांनी सदर वृद्धची काळजी घेतली. या काळात उपचार घेणारे इतर रुग्णही रामगौडा यांचे मित्र झाले होते. रामगौडा यांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना कुठे पाठवावे हा प्रश्न सर्वांना पडला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी संस्थेचा शोध घेऊन रामगौडा यांना बोधी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित संत गाडगे महाराज शहरी बेघर निवारा गृहात नेण्यात आले. साहेबराव केळोदे यांनी जीवनावश्यक वस्तूंची भेट त्यांना दिली. जीवंतपणी मरणयातना सोसणाऱ्या वृद्धाला माणुसकीने तारल्याची प्रचिती यानिमित्ताने आली. दरम्यान, त्यांना वाटेल तोपर्यंत निवारागृहात ठेवणार असल्याचे प्रशांत दंदे, इक्बाल पठाण यांनी सांगितले. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ येत असले तरीही मात्र रक्ताची नाती दुरावत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.