Vinod Patil On Girish Mahajan: जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) रखडलेल्या आरोग्य पदभरतीबाबब माहिती विचारणाऱ्या उमेदवाराला फोनवरून झापतानाची ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची कथित ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लीपच्या सत्यतेबाबत एबीपी माझा पुष्टी करत नाही. मात्र व्हायरल होणाऱ्या कथित ऑडियो क्लिपमुळे महाजन यांच्यावर जोरदार टीका होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी सुद्धा महाजन यांच्यावर निशाणा साधत खोचक टोला लगावला आहे. रोजगारासाठी प्रश्न विचारणाऱ्या युवकांचा आवाज दाबण्याची असुरी शक्ती तुम्हाला कुठून आली?, असा टोला विनोद पाटील यांनी लगावला आहे. 


याबाबत विनोद पाटील यांनी फेसबुक पोस्ट (Facebook Post) करत म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे जबाबदार मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषद भरतीसंबंधी केलेल्या अर्वाच्य वक्तव्याचा जाहीर निषेध. सरकार कोणाचे असो आम्हाला फक्त नोकरी द्या या एकाच आकांत भावनेतून आजचा युवक नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र असे असताना त्याचे दुःख, त्याच्या वेदना तुमच्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही. त्यामुळे इतक्या असंवेदनशील मनाचा निषेध करावा तितका थोडाच. जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये 13 हजार 521 जागांसाठी जवळपास 13लाख परीक्षार्थींनी अर्ज केले. या परीक्षार्थीकडून 25 कोटी 87 हजार रुपये आपल्या सरकारने जमा केले. मग परीक्षा कधी असे विचारल्याचा इतका राग का?, असा प्रश्न विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे. 


'त्या'कोट्यवधी रुपयांचं काय केलं?


पुढे बोलतांना पाटील म्हणाले की, इतके वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची काय अवस्था झाली असेल?, राज्यात टीईटी, आरोग्य भरती, महापरीक्षामध्ये घोटाळे झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे ही भरती परत घेण्याची जबाबदारी आपण त्याच खाजगी भ्रष्टाचारी कंपन्यांना देणार की, पारदर्शकपणे भरती प्रक्रिया पार पाडणाऱ्या MPSC, IBPS सारख्या नामांकित आयोग, संस्थाकडे देणार याचे उत्तर द्यावे. तर रोजगारासाठी प्रश्न विचारणाऱ्या युवकांचा आवाज दाबण्याची असुरी शक्ती तुम्हाला कुठून आली?, भरती प्रक्रिया रद्द केली तर मग जवळपास 13 लाख अर्जांमधून मिळालेले 25 कोटी 87 हजार रुपयांचे काय केले? असा प्रश्न विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे. 


महाजन यांच्यावर होतेय टीका...


गेल्या तीन-चार दिवसांपासून सोशल मीडियावर गिरीश महाजन यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून महाजन यांच्यावर टीका केली जात आहे. सोबतच विद्यार्थी संघटना देखील आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. तर सोशल मीडियावर महाजन यांच्याबद्दल विद्यार्थी नाराजी व्यक्त करतांना पाहायला मिळत आहे.