Aurangabad News: आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण झाला असताना आता परतीच्या पावसाने बळीराजाची चिंता वाढवली आहे. त्यामुळे उरल्यासुरल्या पिकांचे सुद्धा माती झाली आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात देखील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी संध्याकाळी वैजापूर येथील नुकसानग्रस्त भागात जाऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तर याचवेळी शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. 


औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यात परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तर परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावे असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पंचनामा करीत असतांना एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामा अभावी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही दिल्या. यावेळी त्यांनी गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव, रांजणगाव तर, वैजापूर तालुक्यातील भग्गाव, लाडगाव, नांदूरढोक, कापूस वडगाव या गावातील शिवार परिसरातील शेत बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.


प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती 


यावेळी अब्दुल सत्तार यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित असल्याचे पाहायाला मिळाले. ज्यात वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरणारे, गंगापूर तहसीलदार सतीश सोनी, गंगापूर तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे, वैजापूर तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, गंगापूर गटविकास अधिकारी विजय परदेशी, वैजापूर गटविकास अधिकारी हरकळ यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 


वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश 


राज्यात 1 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या 12 दिवसात सरासरी 7  दिवस पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परतीच्या या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करु नये असे मंत्री अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या...


Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी, शेती पिकांना मोठा फटका, आजही राज्यात पावसाची शक्यता


पाच वर्षानंतर शेतकऱ्यांना दिलासा! पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश