Aurangabad Agriculture News: एकीकडे अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकरी (Farmer) संकटात सापडला असतानाच दुसरीकडे औरंगाबादच्या खुलताबादमधील एका शेतकऱ्यांने कष्ट आणि योग्य नियोजनाच्या जीवावर अद्रक (Ginger) थेट दुबईच्या बाजारपेठेत (Dubai Market) पाठवली आहे. विशेष म्हणजे या अद्रकला दुबईच्या बाजारपेठेत 4 हजार 200 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या या यशोगाथाची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
खुलताबाद शहर परिसरातील शेतीमधून काढण्यात आलेली अद्रक नुकतीच दुबईला पाठविण्यात आली असून तालुक्यातून पहिल्यादांच सातासमुद्रापार अद्रक गेल्याने उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खुलताबाद शहरातील शेतकरी लक्ष्मण काळे यांनी पारंपारिक पीकांना फाटा देत अद्रकचं उत्पन्न घेण्याचा निर्णय घेतला. पुढे त्यांनी अद्रक पिकाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरु ठेवले आणि आज त्यांच्या अद्रकला दुबईच्या बाजारपेठेत मागणी आहे.
काळे यांनी नुकतीच एका फाउंडेशनच्या माध्यमातून 200 क्विंटल अद्रक नाशिक येथे कंटनेरमध्ये लोड करून 19 नोव्हेंबर रोजी ती दुबईला पाठविली होती. दुबईला पाठविण्यात आलेल्या त्यांच्या अद्रकला 4 हजार 200 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे. तर खुलताबादच्या स्थानिक बाजारात त्यांना 3 हजार 800 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला होता. त्यामुळे दुबईला गेलेल्या अद्रकला त्यांना स्थानिक बाजारपेठेपेक्षा 400 रुपयांचा अधिक भाव मिळाला आहे.
फक्त अद्रकीचं पीक...
लक्ष्मण काळे यांना खुलताबाद येथे म्हैसमाळ रोडवर 16 एकर जमीन आहे. मात्र इतर नगदी पीके घेण्याचे टाळत ते फक्त अद्रक एवढंच पीक घेतात. याच अद्रकचे पीक घेतांना ते नेहमी वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करत असतात. त्यांच्या याच प्रयोगानंतर त्यांची अद्रक दुबईकरांची पहिली पसंती ठरली आहे.
...आणि दुबईचं बाजारपेठ मिळाले
तर इतर अद्रकीच्या तुलनेत लक्ष्मण काळे यांनी उत्पादन घेतलेल्या अद्रकीच्या कंदाची जाडी आणि कंदाच्या कांडीची लांबी जास्त आहे. त्यांच्या अद्रकीचा कंद चमकदार असल्याने अशा प्रकारच्या अद्रकीची मागणी जास्त असते. यामुळेच लक्ष्मण काळे यांची अद्रक दुबईला जाण्यास पात्र ठरल्याचं त्यांनी सांगितले. सोबतच दुबईला जाणाऱ्या अद्रकीची कुठलीच रेसुड्यू तपासणी होत नसल्याने कुठलीच अडचण उत्पादक शेतकऱ्यांना येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची अद्रक दुबईच्या बाजारपेठेस पाठविण्यास काहीच अडचण नसल्याचेही लक्ष्मण काळे यांनी सांगितले.
Aurangabad Rain News: औरंगाबादच्या अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी, शेतकऱ्यांची चिंता वाढली