Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा (Aurangabad Renaming) मुद्दा चर्चेत आला आहे. तर अनेक ठिकाणी औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) असा उल्लेख केला जात आहे. मात्र यावर आता औरंगाबाद जिल्हा (Aurangabad District) प्रशासनानेच अधिकृत खुलासा केला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्या पत्राला उत्तर देतांना 'औरंगाबाद नामांतराबाबतचे महसूल प्रशासनाला कोणतेही अधिकृत शासन परिपत्रक, शासन निर्णय किंवा राजपत्र अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाही,' असा खुलास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण...


माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास एक पत्र लिहून, औरंगाबाद जिल्ह्याच्या नावाबाबत संभ्रम असून जिल्ह्याचे खरे नाव काय आहे याचा खुलासा करण्याची विनंती केली होती. तर जाधव यांच्या पत्राला निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी लेखी पत्र देऊन उत्तर दिले आहे. ज्यात 'सदर प्रकरणात महसूल शाखेस शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अधिकृत शासन परिपत्रक,शासन निर्णय किंवा राजपत्र द्यापपर्यंत प्राप्त झालेले नाही,' असा खुलासा करण्यात आला आहे. 


जाधव यांचे पत्र...


माजी हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात म्हंटले होते की, "औरंगाबाद शहराचे नाव हे संभाजीनगर किंवा छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यात आले आहे. अशा पध्दतीने घोषित करीत आहेत. त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते सबंध जिल्हयामध्ये छत्रपती संभाजीनगर आम्ही केलं अशा पध्दतीचे बोर्ड लावत आहेत. तथापि सर्व सामान्य माणसाला याच्यामध्ये द्विधा होत आहे. कारण औरंगाबाद महानगरपालिकेच्या बोर्डवर अजूनही औरंगाबाद आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बोर्डवरही औरंगाबाद नाव आहे. त्यामुळे याच्यामध्ये विसंगती असल्यामुळे नेमके खरे शासनाचे नांव या जिल्ह्याचे काय आहे, यासंदर्भात आम्हाला लेखी खुलासा देण्यात यावा' , असे जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहले होते. ज्यालाच उत्तर देतांना औरंगाबाद नामांतराबाबतचे कुठलेही राजपत्र नसल्याचं जिल्हा प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. 


नामांतराला केंद्राची लवकरच मंजुरी


एकीकडे औरंगाबाद नामांतराबाबतचे कुठलेही अधिकृत शासन निर्णय झाला नसल्याचा खुलास जिल्हा प्रशासनाने केला असून, दुसरीकडे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी केंद्राची लवकरच मंजुरी  मिळणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला आहे. औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याचा प्रस्ताव शिंदे-फडणवीस सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या प्रस्तावास लवकरच मंजुरी मिळणार असल्याचं डॉ. भागवत कराड म्हणाले. औरंगाबादच्या जयभवानीनगर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली आहे. 


Aurangabad: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी केंद्राची लवकरच मंजुरी, केंद्रीय मंत्र्यांची माहिती