Aurangabad Rain Update: आधी अतिवृष्टी (Heavy Rain) त्यानंतर परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केल्यावर, आता शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) संकट उभं राहिले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) कालपासून अनेक भागात पावसाने (Rain) हजेरी लावली आहे. कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे औरंगाबाद ग्रामीण भागातच नाही तर शहरात देखील तब्बल तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
औरंगाबादसह मराठवाड्यात (Marathwada) 10 डिसेंबरनंतर अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. काही भागात विजेच्या कडकडाटसह जोरदार पावसाचे अंदाज देखील यावेळी वर्तवण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी औरंगाबादच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर काही भागात मध्यरात्री अचानक पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. तसेच आज सकाळी देखील काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
'या' भागात पावसाची हजेरी...
उंडणगाव परिसरात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणानंतर बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोयगाव शहरासह परिसरात बुधवारी दुपारी चार वाजल्यापासून पावसाने हजेरी लावली तर, फर्दापूर परिसरात देखील घगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. तसेच गंगापूर शहरात रात्री 12 वाजता अर्धा तास जोरदार पाऊस झाला असून, ममदापुर, अगरकानड गाव परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. तर रात्री दोन वाजेच्या सुमारास चापानेर परिसरात अचानक पावसाने हजेरी लावल्याने कपाशी, मका पिकांना फटका बसला आहे. सोबतच कन्नडच्या देवगाव रंगारी, शेवता, बोरसर, ताडपिपंळगा परिसरात रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. त्याचबरोबर पैठण शहरात आणि तालुक्यातील अनेक भागात रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला आहे.
शेतकरी पुन्हा संकटात...
कालपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे खरिपातील मका, कापूस तसेच भाजीपाला पिकांना याचा फटका बसला आहे. खरीप हंगामातील गंजी करून ठेवलेल्या मका पिकाचे, तर शेतात वेचणीस आलेला कापूस ओला झाला. त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे खरीप हातून गेला असतानाच आता रब्बी देखील अवकाळी पावसामुळे धोक्यात आला आहे. अशात आपल्या पीकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धरपड सुरु आहे. तर दुसरीकडे झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्याची मागणी देखील शेतकरी करत आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसानीबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची शक्यता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा