Aurangabad News: शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला असून, औरंगाबादला तीन मंत्रिपद मिळाले आहे. ज्यात संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि अतुल सावे यांचा समावेश आहे. तर या तिन्ही आमदारांनी शपथविधी घेतल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष साजरा केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पाचोड, पैठण,  सिल्लोड, सोयगाव आणि शहरातील गुलमंडी येथे जल्लोष साजरा करण्यात आला आहे. 


उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री असलेल्या संदिपान भुमरे यांना शिंदे सरकारमध्ये संधी मिळताच त्यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघात ठीक-ठिकाणी जल्लोष केला जात आहे. पैठण शहरात आतिषबाजी करण्यात आली तर, भुमरे यांच्या पाचोड गावात त्यांच्या समर्थकांनी ढोल-ताशा वाजवत गुलाल उधळला. तसेच त्यांच्या गारखेडा परिसरात असलेल्या कार्यलयासमोर सुद्धा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. 


सिल्लोडला जोरदार जल्लोष...


सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांना सुद्धा शेवटच्या क्षणी मंत्रीमंडळात संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यात समर्थकांनी जोरदार जल्लोष साजरा केला आहे. सत्तार यांच्या सिल्लोड येथील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत ढोल-ताशेच्या तालावर मनसोक्त डान्स केला. तसेच गुलाल उधळत आतिषबाजीही केली. यावेळी सत्तार यांना न्याय मिळाला असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 


भाजपचाही जल्लोष...


संदिपान भुमरे आणि सत्तार यांना शिंदे गटाकडून संधी मिळाली आहे, तर अतुल सावे यांना सुद्धा भाजपकडून मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपकडून शहरातील गुलमंडीवर जल्लोष साजरा करण्यात आला. अतुल सावे यांना मंत्रिपद मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. 


औरंगाबादला एकूण पाच मंत्रिपद...


उद्धव ठाकरे यांच्याविरूद्ध एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात सर्वाधिक आमदार औरंगाबाद जिल्ह्यातील होते. त्यामुळे शिंदे गटातून औरंगाबाद दोन मंत्रिपद मिळाले आहे. तर सावे यांच्या रूपाने औरंगाबादला तिसरे मंत्रिपद मिळाले आहे. दरम्यान राज्यसभा आमदार भागवत कराड आणि औरंगाबादचा काही भाग असलेल्या जालना लोकसभेचे खासदार रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारमध्ये औरंगाबादला तीन तर केंद्र सरकारमध्ये दोन अशी एकूण पाच मंत्रिपद औरंगाबादला मिळाले आहे.