Maharashtra Cabinet Expansion : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अखेर पार पडत असून, आज अनेक आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. यात औरंगाबादच्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले संदिपान भुमरे यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. साखर कारखान्याचे स्लिप बॉय ते दुसऱ्यांदा कॅबिनेट मंत्री असा भुमरे यांचा राजकीय प्रवास आहे.
प्रत्येकवेळी 'एकनाथा'ची साथ...
शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असणारे भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांची समाधी आहे. त्यामुळे भुमरे 'एकनाथ भक्त' असून, आपल्यावर नेहमीच नाथांचे आशीर्वाद असल्याचे भुमरे म्हणतात. तर स्लीप बॉय म्हणून ज्या कारखान्यात भुमरे यांनी काम केले त्याचं नाव सुद्धा संत एकनाथ साखर कारखाना आहे. तर याच संत एकनाथ साखर कारखान्यात ते चेअरमन झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजयाचा झेंडा फडकवत पुढे कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले. अशातच आता पुन्हा एका एकनाथाने त्यांच्या आयुष्यात एन्ट्री केली आहे. कारण उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. त्यातच आता 'एकनाथ सरकारमध्ये मंत्री सुद्धा झाले आहे.
पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि...
पैठण तालुक्यातील पाचोड गावातील ग्रामपंचायत सदस्य पासून भुमरे यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरवात केली होती. याच काळात त्यांनी संत एकनाथ साखर कारखान्यात स्लीप बॉय म्हणून काम केले. तशी घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असतांना भुमरेंनी शिवसेनेची साथ सोडली नाही. त्यांच्या हाच एकनिष्ठपणा त्यांना एक दिवस विधानसभेत गेला. आतापर्यंतच्या निवडणुकीत 2009 ची विधानसभा निवडणूक वगळता आजवर ते या मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले आहेत.
पहिल्यांदा उमेदवारीसाठी थेट सामना कार्यालयातच...
संदिपान भुमरे यांनी 1995 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी थेट सामना कार्यालयात शक्तिप्रदर्शन केले होते. शिवसेनेचे नेते संजय राऊत औरंगाबादच्या सामना कार्यालयात आले होते. त्यावेळी भुमरे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह औरंगाबादच्या सामना कार्यालयात जाऊन धडकले. भुमरे यांना उमेदवारी द्या म्हणून, समर्थकांनी मोठी घोषणाबाजी केली. राऊत यांनी त्यांना आश्वासन देण्याचा प्रयत्न केला पण समर्थक आयकायला तयार नव्हते. शेवटी राऊत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना फोन करून माहिती दिली. त्यांनतर बाळासाहेबांनी भुमरे यांना मातोश्रीवर बोलावून घेतले आणि त्यांनतर त्यांची उमेदवारी निश्चित झाली.
असा आहे भुमरेंचा प्रवास...
- 1995 साली पैठण विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले.
- 1999 साली पैठण विधानसभा मतदारसंघातून पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले.
- 2004 साली पैठण विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले.
- 2009 साली विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.
- 2014 साली पैठण विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आले.
- 2019 साली पैठण विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आले.
- 2019 साली ठाकरे सरकारमध्ये रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री म्हणून नियुक्त.
मतदारसंघात जल्लोष...
भुमरे यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पैठण मतदारसंघात कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा केला जात आहे. सोबतच भुमरे यांच्या पाचोड या मूळ गावात सुद्धा मोठी आतिषबाजी करत भुमरे यांच्या मंत्रीमंडळात वर्णी लागल्याचा आनंद साजरा केला जातोय.