Thirty Thirty Scam: राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्यातील आरोपी संतोष राठोडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कोठडीत असताना संतोष राठोडने फोनवरून संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तर 'एबीपी माझा'ने याबाबत बातमी दाखवली होती. दरम्यान, 'एबीपी माझा'च्या बातमीची दखल घेत हर्सूल जेल प्रशासनाने संतोष राठोड फोन संभाषण प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. तर औरंगाबाद शहर पोलिसांकडून देखील चौकशी केली जात आहे. 


राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याप्रकरणी मुख्य आरोपी संतोष राठोड सध्या हर्सुल कारागृहात आहे. दरम्यान, याचप्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीनं या सर्व प्रकरणाची माहिती मागवली होती. ईडीने माहिती मागवल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेला संतोष राठोड याने आपल्या नातेवाईकांशी फोनवरून संपर्क साधला होता. तर याच संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याबाबत 'एबीपी माझा'ने बातमी दाखवली होती. दरम्यान याची दखल घेत कारागृह प्रशासनाने चौकशी सुरू केली असल्याची माहिती, जेल आधिकारी अरुणा मुगुटराव यांनी दिली आहे. त्यामुळे आता संतोष राठोडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 


शहर पोलिसांकडून देखील चौकशी सुरू...


दरम्यान, संतोष राठोडला हर्सुल कारागृहातून न्यायालयात घेऊन गेल्यावर हा संभाषण झाला असल्याचा देखील अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे, राठोडला न्यायालयात नेण्याची जबाबदारी शहर पोलिसांवर होती. त्यामुळे आता औरंगाबाद पोलीस आयुक्त यांनी देखील चौकशीचे आदेश दिले आहे. राठोडला न्यायालयात घेऊन जाणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मोबाईलचे कॉल डीटेल्स तपासले जाणार आहे. सोबतच ज्या भागातून ते राठोडला घेऊन गेले त्या परिसरातील मोबाईल टॉवरवरील हिस्ट्री तपासली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त यांनी दिली आहे. 


काय आहे तीस-तीस घोटाळा? 


औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरात शासकीय प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. त्यामुळे याचा मोठ्याप्रमाणावर मोबदला शेतकऱ्यांना मिळाला होता. मात्र याचवेळी संतोष राठोडने या शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले. मात्र नंतर पैसे परत देत नसल्याने शेतकऱ्याने पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. तब्बल साडेतीनशे कोटींचा हा घोटाळा असल्याचा अंदाज आहे. ज्यात शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. तर यात अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची देखील नावं आहेत. सोबतच शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील यात पैसे गुंतवले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Thirty Thirty Scam : तीस-तीस घोटाळ्यातील आरोपीच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमधील संपूर्ण संभाषण; न्यायालयीन कोठडीत पुरवला गेला मोबाईल