Aurangabad News: ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे पुत्र ऋषिकेश खैरे यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीच्या पत्नीच्या बदलीसाठी त्यांनी दोन लाख रुपये घेतल्याच या ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे. विशेष म्हणजे याबाबत खुद्द ऋषिकेश खैरे यांनी देखील पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे यावरून आता शिंदे गटाकडून ऋषिकेश खैरे यांच्या चौकशीची मागणी केली जात आहे. शिंदे गटाचे औरंगाबाद युवा सेना जिल्हाप्रमुख शेखर जाधव यांनी याबाबत मागणी केली आहे. 


शेखर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ऋषिकेश खैरे यांची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. एका गरीब घरातील मुलीचे दोन लाख रुपये घेऊन खैरे यांनी परत केले नाही. अनेकदा पैसे मागून देखील ऋषिकेश खैरे यांनी पैसे काही परत केले नाही. तसेच आज उद्या करत या महिलेचे अडीच तीन वर्षे वाया घातले. त्यामुळे ऋषिकेश खैरे यांनी आतापर्यंत किती गोरगरिबांचे पैसे बदलीच्या नावाखाली खाल्ले आहेत याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिंदे गटाचे औरंगाबाद युवा सेना जिल्हाप्रमुख शेखर जाधव यांनी केली आहे. 


ऋषिकेश खैरे यांची प्रतिक्रिया! 


या सर्व प्रकरणावर 'एबीपी माझा'ने ऋषिकेश खैरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा यावर बोलताना ऋषिकेश खैरे म्हणाले की, कोरोनाच्या आधी माझा एका मित्र त्याच्या पत्नीची बदली करण्यासाठी माझ्याकडे आला. त्यावेळी राज्यात आमचं सरकार असल्याने बदलीचे काम करून देऊ, असे मी त्याला सांगितले. पण अचानक कोरोना आला आणि त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्याने बदलीचे काम होऊ शकले नाही. मात्र असे असलं तरीही माझ्याकडे असलेले पैसे देण्यासाठी मी तयार असल्याचं ऋषिकेश खैरे म्हणाले. 


महाविकास आघाडीच्या काळात बदल्यासाठी पैसे? 


महाविकास आघाडीवर भाजपकडून सतत भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांवर देखील गंभीर आरोप करण्यात आले होते. तर काही मंत्र्यांना जेलवारी देखील करावी लागली आहे. मात्र आता ठाकरे गटातील एका मोठ्या नेत्याच्या मुलाने महाविकास आघाडीचं सरकार असताना बदलीसाठी पैसे घेतल्याचं मान्य केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या काळात बदल्यासाठी पैसे घेतले जात होते का? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. 


संबंधित बातम्या: 


महाविकास आघाडीच्या काळात पैसे देऊन शासकीय बदल्या; खैरेंच्या मुलाच्या ऑडिओ क्लिपने खळबळ