Aurangabad Swine Flu Causes: कोरोनाची संख्या कमी होत असतांना आता स्वाइन फ्लूने औरंगाबादकरांची चिंता वाढवली आहे. कारण गेल्या दोन दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 8 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. गेली तीन वर्षे कोरोनाचा मुकाबला करत असतांना आता स्वाइन फ्लूची वाढती रुग्ण संख्या चिंतेचा विषय बनला आहे. 


औरंगाबादेत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची वाढ होणे सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे.जिल्ह्यात सध्या स्वाइन फ्लूच्या 14 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सोमवारी रुग्णसंख्या 45 वर पोहोचली. सद्या पावसाळा सुरु असल्याने सर्दी,ताप असे लक्षणे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्दी म्हणून दुर्लक्ष न करता नागरिकांनी आवश्यक तो आरोग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. 


दोघांचा मृत्यू...


पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांच्या मृत्युच्या घटनांनी आरोग्य यंत्रणा हादरली होती. मात्र लसीकरण सुरु होताच कोरोनावर मोठ्याप्रमाणावर नियंत्रण मिळवता आले आहे. पण कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूने औरंगाबादकरांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत 45 रुग्ण आढळून आले असून,काही रुग्ण बाहेर जिल्ह्यातील आहे. तर यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. 


कोरोना रुग्ण संख्या घटली...


स्वाइन फ्लूने औरंगाबादकरांची चिंता वाढवली असली तरीही कोरोना रुग्ण संख्या मात्र कमी होतांना पाहायला मिळत आहे. सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यात फक्त 1 रुग्ण आढळून आला आहे. तर ग्रामीण भागात सोमवारी एकही रुग्ण आढळून आला नाही. तर सद्या 22 सक्रीय रुग्ण असून, त्यापैकी 20 जणांना कोणतेही लक्षणे नसल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहे.