Aurangabad News: गेल्या आठवड्यात औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्च्याची महत्वाची बैठक पार पडली होती. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत तरुणांना कर्ज दिले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान याच मुद्यावरून आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची भेट घेतली. यावेळी कराड यांना निवेदन सुद्धा देण्यात आले.


याबाबत बोलतांना मराठा आरक्षणाच्या बाजूने लढत असलेले याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, औरंगाबाद येथे नुकताच पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत तरुणांना कर्ज दिले जात नाही हा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेतली. आमच्या तरुणांना उद्योगासाठी कर्ज पुरवठा करताना राष्ट्रीय बँका टाळाटाळ करता किंबहुना उभे सुद्धा करत नसल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे सर्व बँक अधिकाऱ्यांची आपल्या अध्यक्षतेखाली आमच्या समवेत बैठक घेऊन बँकांना निर्देश द्यावेत अशी मागणी केंद्रीय मंत्र्यांना केली,असल्याचं विनोद पाटील म्हणाले. तसेच बैठकीत ठरल्याप्रमाणे एक मुद्दा आज पुढे आणला असून, महिला भगिनींनी याचे निवेदन कराड यांना दिले असल्याचं विनोद पाटील म्हणाले. 


सरकारला पंधरा दिवसांची मुदत...


गेल्या आठवड्यात औरंगाबाद शहरात झालेल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. ज्यात सरकराने पुढील पंधरा दिवसांत मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा अन्यथा त्यांना निर्णायक आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाविषयी नव्याने प्रकिया सुरु करून ओबीसी प्रवर्गातून आम्हाला आरक्षण देणार का? याचा खुलासा सरकराने करावा. किंवा सरकार सुप्रीम कोर्टात रिव्ह्यू पिटीशन करणार आहे का? या दोन्ही पैकी एक भूमिका सरकारला जाहीर करावी लागेल, असा इशारा यावेळी या बैठकीतून देण्यात आला. 


पुढचा लढा वेगळा...


याच बैठकीत बोलतांना विनोद पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी यापूर्वी आम्ही रस्त्यावर उतरून लढलो. न्यायालयात याचिका दाखल करत कायदेशीर लढा सुद्धा दिला. मात्र पुढील पंधरा दिवसांत निर्णय न झाल्यास आता पुढचा लढा वेगळा असणार आहे. आमचा हा लढा कसा असणार हे महाराष्ट्र पाहिलं असेही पाटील म्हणाले. तसेच या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती विनोद पाटील यांनी दिली आहे.