Shiv Sena Symbol: शिवसेना आणि शिंदे गटात शिवसेना कोणाची यावरून वाद सुरु असतानाच निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं. सोबतच एकनाथ शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेना नावही वापरता येणार नाही. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान,'निवडणूक आयोगाला एवढी काय घाई होती की, चोवीस तासात निर्णय घेण्यात आला' अशी खोचक प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, हा निर्णय निवडणूक आयोगाने कोणात्या दबावाखाली घेतला आहे. गल्लीतील लहान मुलगाही सांगेल की, हा निर्णय दबावाखाली घेण्यात आला आहे. त्यामुळे हाच शिंदे गटाचा हा अट्टाहास होता का? हा भाजपचा कुटिल डाव आहे. त्यांना कुठलाही राजकीय पक्ष नको आहे, असेही अंबादास दानवे म्हणाले. जनता आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून, त्यांच्या नेतृत्वावर प्रत्येक शिवसैनिकाला विश्वास असल्याचे दानवे म्हणाले.
दानवेंची फेसबुक पोस्ट...
निवडणूक आयोगाच्या निकालावर अंबादास दानवे यांनी फेसबुकवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात, 'आता कदाचित न पक्षाचे नाव असेल न चिन्ह सोबत आहे. फक्त 'ठाकरे' नावाचा पुण्यसंचय आणि सत्कर्म....कायदेशीर लढाया सुरूच राहतील. मात्र आमच्या पूर्वाश्रमीच्या मित्राने कितीही आपटली तरी 'ठाकरे' नावाचे वलय काढून घेण्यास त्यांना अजून अनेक जन्म घ्यावे लागतील, असे दानवे म्हणाले...
बस नाम ही काफ़ी है, उद्धव बाळासाहेब ठाकरे....
सोबतच दानवे यांनी आणखी एक पोस्ट करत म्हटले आहे की, प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना विचारलं, 'बाळ, व्याख्यानं, भाषणात असं सगळं तुझं सुरू आहे. हे सारं असंच चालू ठेवणार, की त्यास काही संघटित स्वरूप देणार??... हा विद्रोह संघटित व्हायला हवा आणि त्यातून जन्म झाला लोकांच्या संघटनेचा.. जन्म झाला शिवसेनेचा!... मराठी माणसाच्या वेदनेतून निर्माण झालेल्या संवेदनांचा सत्याविष्कार म्हणजे 'शिवसेना'...निष्ठावंत शिवसैनिकांची संघटना म्हणजे 'शिवसेना'.. या संघटनेचे चिन्ह आणि नाव गोठवले जाणे हे दु: ख खूप मोठे आहे. एकनाथ शिंदे तुम्हाला सामान्य शिवसैनिक कधीच माफ करू शकणार नाही, गद्दार...
महत्वाच्या बातम्या...