Maharashtra Winter Session 2022: किमान वेतन कायदा लागु करण्याच्या मागण्यासाठी राज्यभरातील ग्रामपंचायत संगणक परिचालक (Gram Panchayat Computer Operator) पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता असून, 20 डिसेंबर 2022  ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात (Winter Session 2022) विधानभवनावर भव्य मोर्चा काढणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मागण्यासाठी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करूनही, न्याय मिळत नसल्याने हा मोर्चा काढला जाणार आहे. याबाबत ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्या वतीने राज्यातील मंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. 


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या माध्यमातुन पंचायत राज संस्थाच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत संगणक ऑपरेटर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ज्यात सन 2011 ते 2015  मध्ये संग्राम प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीकरीता एक संगणक परिचालक असे पद निश्चीत करून कार्यान्वीत होते आणि 2016  ते सद्यस्थित आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात सुध्दा संगणक ऑपरेटर यांची नियुक्ती कायम आहे. विशेष म्हणजे या ग्रामपंचायत संगणक परिचालकांना फक्त 6 हजार 960 एवढेच तुटपुंजे मानधन मिळत आहे. त्यामुळे किमान वेतन कायदा लागु करण्याची मागणी ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेकडून करण्यात आली आहे. 


संगणक परिचालकांना करावी लागणारे कामे... 


संगणक परिचालक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार, ग्रामपंचायत मधील प्रत्येक संगणक परिचालक शासनाचे सर्व विभागाचे ऑनलाईन व ऑफलाईन कामे करतो. ज्यात 1 ते 33 नमुना ऑनलाईन करणे, शेतकरी कर्जमाफी योजना, अस्मिता योजना, जणगणना, आवास प्लस योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना, किसान सन्मान निधी योजना, सर्व शासकीय योजनेची माहिती नागरीकांपर्यंत पोहोचविणे, ग्रामपंचायीचे सर्व ऑनलाईन व ऑफलाईन कामे, स्वच्छ भारत मिशन योजना, माझी वसुधंरा, नरेगा, आयुष्यमान भारत, श्रमयोगी मानधन योजना, कामगार कल्याण योजना, अंगणवाडीतील सर्व ऑनलाईन व ऑफलाईन कामे, पोषण आहार, आशा सेविकांची कामे केली. तर  कोरोनाच्या भयावह स्थितीमध्ये संगणक परिचाकांनी काम केल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. 


अन्यथा विधानभवनावर मोर्चा काढणार.... 


किमान वेतन कायदा लागु करण्याची मागणी ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेकडून करण्यात आली आहे.  तर संगणक परिचालकाला त्यांच्या न्याय व हक्क न मिळाल्यास 20 डिसेंबर 2022  ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर आंदोलन केले जाईल. यास संपूर्णतः शासन व प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे. 


Muslim Reservation : मोठी बातमी! मुस्लिम आरक्षणासाठी 'एमआयएम'चा मोर्चा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात धडकणार