Gram Panchayat Election: औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतसाठी उद्या मतदान प्रकिया पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. तर जिल्ह्यातील अनेक आमदार आणि मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे उद्याच्या मतदान आणि त्यानंतर 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आणि रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या मतदारसंघात देखील उद्या ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. 


पाहा कोणत्या मतदारसंघात कोणाची प्रतिष्ठा पणाला... 


औरंगाबाद पश्चिम : औरंगाबाद पश्चिम हा आमदार संजय शिरसाट यांचा मतदारसंघ असून, त्यांच्या मतदारसंघात 6 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. तर याठिकाणी शिंदे सेना, ठाकरे सेना व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 


सोयगाव मतदारसंघ : सोयगाव तालुका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघाचा भाग आहे. या तालुक्यात 5 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. ज्यात कंकराळा ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. तर उरलेल्या वाडी सुतांडा, सावरखेडा लेनापूर, वरखेडी व वनगाव पोहरा या चार ग्रामपंचायतीमध्ये शिंदे सेना व महाविकास आघाडीचे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


खुलताबाद तालुका : खुलताबाद तालुका भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघाचा भाग आहे. खुलताबाद तालुक्यात 10 पैकी 1 विरमगाव या ग्रामपंचायतीच्या सरपंचाची बिनविरोध निवड झाली. मात्र या ठिकाणी सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे. उर्वरित 9 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांसाठी उद्या मतदान होणार आहे.  त्यामुळे खुलताबाद तालुक्यात प्रशांत बंब किती ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


फुलंब्री मतदारसंघ : फुलंब्री मतदारसंघ भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांचा मतदारसंघ आहे. तर फुलंब्री मतदारसंघात 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. ज्यात तीन ठिकाणी सरपंच बिनविरोध निवडले आहेत. यापैकी दोन भाजपचे असून एक अपक्ष आहे. तर उर्वरित ठिकाणी उद्या मतदान होणार आहे. 


कन्नड मतदारसंघ : कन्नड मतदारसंघ हा ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सर्वाधिक 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. ज्यात 3 सरपंच व 63 सदस्य बिनविरोध निवडले आहेत. औराळी व देवपूर येथे सरपंच व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत, तर ब्राम्हणी व दहेगाव येथे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, तेथे सरपंचपदासाठी निवडणूक होत आहेत. 


सिल्लोड मतदारसंघ : मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघ असलेल्या सिल्लोडमध्ये 18  ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सिल्लोड तालुक्यातील एकही ठिकाणी सरपंच अथवा सदस्य बिनविरोध आलेला नाही. या सर्व ग्रामपंचायती छोट्या किंवा कमी सदस्य संख्येच्या असल्या तरीही सत्तारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली नाही.


गंगापूर मतदारसंघ : आमदार प्रशांत बंब यांच्या मतदारसंघ असलेल्या गंगापूर तालुक्यात 32  ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. ज्यात हैबतपूर या ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत. सोबतच पुरी व आगरवाडगाव येथे 2 सरपंच बिनविरोध निवडण्यात आले आहेत. तसेच खडकनारळा ग्रामपंचायतमध्ये सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या असून केवळ सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. 


पैठण मतदारसंघ : पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघ असलेल्या पैठण तालुक्यात 22 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे या तालुक्यात एकही सरपंच बिनविरोध निवडून आला नाही. मात्र 9 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. नांदर, आडुळ, बिडकिन व मुधलवाडी या चार ग्रामपंचायतीची निवडणूक मंत्री भुमरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे. 


वैजापूर मतदारसंघ : ठाकरे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचा मतदारसंघ असलेल्या वैजापूर मतदारसंघात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. तर एक सरपंच व 45 सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. ज्यात हिंगणे कन्नड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. वैजापूर तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायत आमदार बोरनारेंनी प्रतिष्ठेची केली आहे.


Exclusive: मंत्री भुमरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; आचारसंहिता भंग केल्याचा आरोप