Aurangabad Crime News: औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील तीसगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मिनी शाखेत अज्ञात चोरट्यांनी चोरी करत तब्बल साडेचार लाख रुपये लांबवले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे, आपली ओळख पटू नयेत म्हणून चोरट्यांनी मिनी बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेचा डिव्हीआर सुद्धा काढून सोबत नेला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गल्लेबोरगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची मुख्य शाखा आहे. या मुख्य शाखेची मिनी शाखा खुलताबाद तालुक्यातील तीसगाव येथे आहे. तर ही मिनी शाखा तिसगाव येथील संजय जगताप आपल्या स्वतःच्या जागेत चालवतात. नेहमीप्रमाणे बँकेचे कामकाज आटपून जगताप यांनी बँक बंद केली. त्यांनतर जेवण झाल्यानतर ते झोपी गेले. 


जगताप कुटुंबातील सदस्य झोपेत असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटय़ांनी मिनी बँक, ग्राहक सेवा केंद्राचे शेटर उघडून आत प्रवेश केला. त्यांनतर एका टेबलाच्या ड्रापमध्ये ठेवलेले 4 लाख 50  हजार रुपये लंपास केले. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातून बाहेर पडण्यापूर्वी जगताप यांच्या घराच्या दरवाज्याची बाहेरून कडी लावून घेतली. रात्री दोन वाजेच्या सुमारास जगताप यांना जाग आली असता, बँकेत चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनतर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. 


पोलीस घटनास्थळी... 


तीसगाव येथील मिनी बॅंकेत चोरी झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद अघाव, खुलताबाद पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनतर घटनास्थळचा पंचनामा करत जगताप यांच्या जबाबावरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 


ओळख लपवण्यासाठी डिव्हीआर सोबत नेला...


मिनी बँक असल्याने जगताप यांनी आपल्या घरात सीसीटीव्ही बसवले होते. तर बँकमध्ये चोरी करण्यासाठी आलेले चोरटे या सीसीटीव्हीत कैद झाले आहे. आपली ओळख पटण्याची भीती असल्याने चोरट्यांनी बँकमध्ये असलेल्या सीसीटीव्हीचा डिव्हीआर काढून सोबत नेला आहे. त्यामुळे चोरट्यांची ओळख पटू शकली नाही. पोलिसांकडून या चोरट्यांच्या शोधासाठी पथक नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.