Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा (Aurangabad District Corona Vaccine Stock) उपलब्ध नसल्याने गेल्या काही दिवसांपासून लसीकरण (Vaccination) ठप्प पडले होते. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा प्रशासनासह महानगरपालिकेकडून सतत प्रशासनाकडे लसींसाठी पाठपुरावा करण्यात येत होता. दरम्यान अखेर औरंगाबाद जिल्ह्यासाठी 12 हजार कोविशिल्ड लसींचा पुरवठा करण्यात आला आहे. यातील आठ हजार लसी ग्रामीण भागासाठी, तर चार हजार लसी शहरासाठी महापालिका आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. तर लसींचा साठा प्राप्त झाल्याने आजपासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम पुन्हा सुरु होणार आहे. शहरात दहा मनपा आरोग्य केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे.


चीनसह जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशातील आरोग्य यंत्रणेकडून देखील सतर्कतेची सूचना करण्यात आली आहे. यासोबतच लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. असे असताना औरंगाबादेतील आरोग्य विभागाकडे पडून असलेल् तर महापालिकेकडील 14 हजार लसी 31 डिसेंबरला एक्स्पायर झाल्या होत्या. लसी शिल्लक नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण मोहीम पूर्णपणे ठप्प पडली होती. त्यामुळे नवीन लसीची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती. 


75 हजार मागितल्या अन् मिळाल्या 12 हजार 


औरंगाबाद जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम ठप्प पडली होती. त्यामुळे प्रशासनाकडे एकूण 75 हजार नवीन लसींची मागणी स्थानिक प्रशासनाने केली होती. मात्र शासनाकडून जिल्ह्यासाठी एकूण 12 हजार कोविशिल्ड लसी मंगळवारी (17 जानेवारी) देण्यात आल्या. यातील 08 हजार ग्रामीणसाठी जिल्हा आरोग्य विभागाकडे, तर 04 हजार लसी महापालिकेला देण्यात आल्या आहेत. तर आणखी नवीन साठा प्राप्त झाल्यावर आणखी लसी देण्यात येणार असल्याचे शासनाकडून कळवण्यात आल्याचे देखील कळत आहे. 


'या' केंद्रांवर होणार लसीकरण


आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून महानगरपालिकेला 4 हजार कोविशिल्ड लसींचा साठा प्राप्त झाल्याने शहरातील दहा आरोग्य केंद्रांत महापालिकेने बुधवारपासून (18 जानेवारी) लसीकरणाची व्यवस्था केली आहे. यात औरंगपुरा, बन्सीलालनगर, भीमनगर, बायजीपुरा, चेतनानगर, सिडको एन-11, सिडको एन- 8, शिवाजीनगर, चिकलठाणा, सातारा या दहा आरोग्य केंद्रांत लस दिली जाणार अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.


लसीकरणाकडे नागरिकांनी फिरवली पाठ...


दरम्यान कोरोना काळात लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर नागरिक रांगा लावून उभे राहत असल्याचे चित्र पाहायला मिळायचे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेकडे असलेल्या 14 हजार लसी एक्स्पायर झाल्या होत्या. त्यात अजूनही हवा तसा प्रतिसाद लसीकरणासाठी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहे. 


संबंधित बातमी: 


Corona Vaccination: औरंगाबादेतील कोरोना लसीकरण ठप्प, नवीन लसींची प्रशासनाकडे मागणी