ACB Action: औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील गिधाडा गावात एका शेतकऱ्याला 10 हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकावर बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत अनुदानित विहीरचा मोबदला मिळवून देण्यासाठी आरोपी ग्रामसेवकाने शेतकऱ्याकडे 10 हजार रुपयांची लाच मागतीली होती. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. बाबासाहेब नवनाथ तांबे ( रा.शंकरनगर विटखेडा परिसर ) असे लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाच नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गिधाडा गावात त्यांची दोन एकर शेती आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना सरकारच्या रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर मंजूर झाली होती. अनुदानित मंजुर विहीर असल्याने खोदकामासाठी कामच्या टप्पेवारी नुसार शासनाकडून रक्कम अदा करण्यात येते. त्याकरिता खोदकामाचे ग्रामपंचायतमधील रोजगार सेवक पाहाणी करून हजेरी मस्टर तयार करून स्वाक्षरी करतो. त्यानंतर हजेरी मस्टरवर ग्रामसेवक व सरपंच स्वाक्षरी करतात. त्यानंतर ग्रामसेवक संबंधित हजेरी मस्टर गटविकास अधिकारी यांचेकडे मंजुरीसाठी पाठवतात. तेव्हाच शेतकऱ्याला पैसे मिळतात. मात्र ग्रामसेवक तांबे याने हजेरी मस्टरवर सही करण्यासाठी तक्रादार शेतकऱ्याकडे दहा हजार रुपयांची लाच मागतिली होती.
असा अडकला ग्रामसेवक...
ग्रामसेवक तांबे याने लाच मागितल्याने तक्रादार शेतकऱ्याने एसीबी कार्यालयात जाऊन थेट तक्रार दिली. त्यामुळे खात्री करण्यासाठी एसीबीच्या पोलीस निरीक्षक रेशमा सौदागर यांनी सापळा लावला. तक्रादार यांच्याजवळ व्हाइस रेकॉर्डर देऊन सोबत पंच पाठवला. ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याने गावातील जिल्हा परिषद शाळासमोर ग्रामसेवक तांबे यांची भेट घेतली. यावेळी ग्रामसेवक याने हजेरी मस्टरवर सही करण्यासाठी पंचासमोर हाताचे 10 बोट वरती करून दहा हजार रुपयांची लाच मागितली. ग्रामसेवक याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने बिडकीन पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे लाच मागणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात न घाबरता लोकांनी समोर यावे असं आवाहन लाचलुचपत विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.