Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्यावरून वाद सुरु असतानाच सिल्लोड तालुक्यातील एका गावात चौकाला औरंगजेबाचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावेळी रस्त्यावरील चौकांच्या नामकरणावरून दोन गट आमने-सामने येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सिल्लोड तालुक्यातील शिवणा येथे सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान गावात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील शिवणा गावातील चौकांना मौलाना अब्दुल कलाम, औरंगजेब अलमवीर, टीपू सुलतान यांची नावे देण्यात यावी, अशी मागणी एका गटाने केली होती. या मागणीनंतर तसा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एकमताने पास करण्यात आला. ग्रामपंचायतकडून तसे नाहरकत प्रमाणपत्रही देण्यात आले. मात्र याच निर्णयाला दुसऱ्या गटाने विरोध केला आहे. 


पोलिसांनी दोन्ही गटातील 10 जणांना ताब्यात घेतले 


ग्रामपंचायतने गावातील चौकांना मौलाना अब्दुल कलाम, औरंगजेब अलमवीर, टीपू सुलतान यांची नावे  देण्याचा ठराव घेतल्याची माहिती चार- पाच दिवसांनंतर दुसऱ्या गटाला मिळाली. त्यानुसार त्यांनी सोमवारी तातडीने अजिंठा पोलिसांना निवेदन देत औरंगजेब, टीपू सुलतानच्या नावाला विरोध केला. दरम्यान यावरून रात्री हे दोन गट रस्त्यावर आमने सामने आले. यात दोन्ही गटांतील लोकांनी घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी गावात धाव घेतली. रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावात जाऊन खातरजमा करीत शांतता राखण्याचे आवाहन केले. तर पोलिसांकडून दोन्ही गटातील 10 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. 


युवक काँग्रेसच्यावतीने विरोध...


शिवणा ग्रामपंचायतने घेतलेल्या या निर्णयाला युवक काँग्रेसच्यावतीने विरोध करण्यात आला आहे. यावेळी युवक काँग्रेसचे सिल्लोड-सोयगाव विधानसभा अध्यक्ष अँड. निलेश काळे यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की,  भाजप आणि शिंदे गटाची सत्ता असलेल्या शिवणा ग्रामपंचायतने गावातील चौकाला औरंगजेब आणि टीपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला आमचा आणि गावकऱ्यांचा विरोध असणार आहे. क्रूरकर्मा असलेल्या औरंगजेबाचं नाव कदापि आम्ही गावातील चौकाला देऊ देणार नाही. यासाठी युवक काँग्रेसच्यावतीने आम्ही कायदेशीर लढा देणार असल्याची माहिती निलेश काळे यांनी दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: औरंगाबादकरांसाठी गुड न्यूज, मार्च महिन्यात मिळणार 5G सेवा


मोठी बातमी! औरंगाबादमध्ये जुगार अड्यावर पोलिसांची कारवाई, पाच लक्झरी कारसह पावणेदोन कोटीचा मुद्देमाल जप्त