Aurangabad News: औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव शहराच्या जवळच असलेल्या बनोटी रस्त्यावरील पाझर तलावाच्या संरक्षण भिंतीच्या पायथ्याजवळ भगदाड पडलं आहे. त्यामुळे तलावातील पाण्याचा अपव्यय होवून तलावाच्या पाण्याला गळती लागली आहे. आधीच सोयगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणे व पाझर तलावे कोरडीठाक असून, जो तलाव भरलेला आहेत त्याला भगदाड पडल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
सोयगावच्या बनोटी रस्त्याला लागून असलेल्या गवळण नाल्यावरील पाझर तलावाच्या भिंतीच्या पायथ्याशी भगदाड पडल्याने तलावातील पाणी वाहून जात असून, पाण्याची गळती वाढली आहे. या तलावाच्या पायथ्याशी तब्बल 150 हेक्टर शेत जमीन आहे. सोयगाव तालुक्यात पाण्याचे अत्यल्प प्रमाण असल्याने या तलावाच्या पाण्यामुळे विहिरींना जीवनदान मिळाले होते. मात्र तलावाला भगदाड पडून पाणी सर्रास वाहून जात असल्याने या तलावाच्या पाण्याच्या गळतीमुळे तलाव कोरडाठाक होण्याची भीती व्यक्त होत आहे.
धोका निर्माण होण्याची शक्यता?
जलसंपदा विभागाने गवळण नाल्यावरील उभारलेल्या या पाझर तलावात पाणीच पाणी आहे. परंतु या तलावाच्या संरक्षण भिंतीला जलसंपदा विभागाने उन्हाळ्यात डागडुजी न केल्याने या भिंती जवळ गळती सुरु झालेली असून, पाण्याच्या गळतीमुळे भिंतीला धोका निर्माण झालेला असल्याची भीती परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जलसंपदा विभागाचं दुर्लक्ष...
जलसंपदा विभागाने या तलावाची उभारणी केल्यापासून एकदाही प्रत्यक्षात तलावाची डागडुजी केलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कागदपत्री डागडुजी दाखवून या तलावाच्या दुरुस्तीसाठी आलेला मलिदा खाण्यात आल्याचा आरोपही परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्यात पिकांसाठी या तलावाच्या पाण्याचा फायदा होत असला, तरीही पाण्याचीच गळती वाढल्याने पावसाळा संपल्यानंतर हा तलाव कोरडा पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली...
मराठवाड्यात बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असली तरीही, सोयगाव तालुक्यातील परिस्थिती मात्र वेगळी आहे. अपेक्षेप्रमाणे यावर्षी सोयगावात पाऊस झालेला नाही. त्यामुळे तलावात असलेल्या पाण्यावरच पुढील काळ शेतकऱ्यांना काढावा लागणार आहे. मात्र त्यात आता तलावाला गळती लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वेळीच यावर उपयायोजना न केल्यास पाण्याचा अपव्यय होऊन तलावातील पाणी संपण्याची भीती आहे.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: पाच मंत्री असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील 833 शाळा अंधारात
Aurangabad: विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं वैजापूर महामार्गावर रास्ता रोको; वाहतूक ठप्प