Raju Shetti: तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा चंद्रशेखर राव (K.Chandrashekar Rao) यांनी महराष्ट्रात आपल पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी ते राज्यात मराठी शिलेदाराचा शोध घेत आहे. दरम्यान याचवेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना महाराष्ट्र सांभाळा अशी ऑफर दिली होती. मात्र राजू शेट्टी यांनी सोमवारी नम्रपणे ही ऑफर नाकारली आहे. आम्हाला आमच्या संघटनेचं अस्तित्व संपवायचं नाही. तसेच करिअर करण्यासाठी मी राजकारणात आलो नसून, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यासाठी लढा द्यायचा आहे, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी मांडली आहे. त्यामुळे चंद्रशेखर राव यांना आता नवीन नेत्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. 


दरम्यान याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, तेलंगणा राज्याचा विकास कसा झाला याबाबत माझी आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची बैठक झाली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, आम्ही आता तेलंगणा राष्ट्र समिती राहिले नसून, भारत राष्ट्र समिती झालो आहोत. आमच्या पक्षाचा राष्ट्रीय राजकारणात समावेश झाला असून, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे प्रमुख पद घेऊन, आमच्या पक्षात यावे अशी विनंती चंद्रशेखर राव यांनी केली असल्याचं शेट्टी म्हणाले. मात्र मी त्यांना नम्रपणे सांगितले की, तुमची योजना चांगली आहे, भूमिका देखील योग्य आहे. पण मी शेतकरी चळवळीसाठी स्वतःला वाहून घेतलेला कार्यकर्ता असल्याने त्यांची ऑफर नाकारली असल्याचा खुलासा राजू शेट्टी यांनी केला आहे. 


पक्षासाठी मराठी शिलेदाराचा शोध 


तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली असल्याने, त्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले आहेत. त्यामुळे त्यांनी आपली क्षमता आजमावून पाहण्याच्या पहिला प्रयत्न महाराष्ट्रापासून सूरू केला आहे. याचाच भाग म्हणजे त्यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेत, राज्यातील राजकाणात एन्ट्री केली आहे. सोबतच आता ते महाराष्ट्रात नव्या मित्रांचा शोध घेत आहे. त्यांनी यासाठी चाचपणी सुरु केली आहे. दरम्यान केसीआर यांनी राजू शेट्टी यांना तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करा, अशी विनंती केली आहे. त्याशिवाय माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांचीही केसीआर यांच्यासोबत भेट झाली होती. तसेच प्रकाश आंबेडकर देखील 17 तारखेला तेलगंणात केसीआर सोबत एका सोहळ्यात असतील. 


शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रबिंदू...


महाराष्ट्रात आपल्या पक्ष वाढवण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रबिंदू ठेवले आहे. नांदेड जिल्ह्यात झालेल्या सभेत बोलताना देखील त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत सरकारवर निशाणा साधला होता. तर चंद्रशेखर राव यांनी ज्यांना महाराष्ट्र सांभाळण्यासाठी ऑफर दिली ते राजू शेट्टी देखील शेतकरी नेते आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकरणात एन्ट्री करताना चंद्रशेखर राव यांचा शेतकऱ्यांच्या मुद्यावर अधिक भर असल्याचे स्पष्ट होत आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Raju Shetti: 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा', बीआरएसच्या ऑफरवर राजू शेट्टी आज घेणार निर्णय?; पैठणमध्ये बैठक