Chandrakant Khaire: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा देत, उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयाने ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. तर न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. तर अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या प्रचारासाठी आपण हातात मशाल घेऊन घरोघरी जाऊन प्रचार करणार असल्याचे खैरे म्हणाले.
यावेळी पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, न्यायालयाने आम्हाला दिलासा दिला असल्याने त्यांचे आभार व्यक्त करतो. मात्र एक गोष्टीचा राग येतो की, किती छळ करायचा. आम्हाला उमेदवार मिळूच नाही यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले गेले. खऱ्या शिवसेनेला शिंदे गट कसा त्रास देत आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे निवडणूकीत ही जनता त्यांना नक्कीच जाब विचारणार असल्याचे खैरे म्हणाले.
मी घरोघरी जाऊन प्रचार करणार...
यावेळी बोलतांना चंद्रकांत खैरे म्हणाले की, यापूर्वी कधीही असे राजकारण नव्हते मात्र आता खूप वाईट आणि घाणेरडे राजकारण सुरु आहे. आता या राजकारणाला सीमाच उरल्या नाहीत. शिंदे गटाकडून हे राजकारण सुरु असल्याचे मी स्पष्ट बोलतोय. उद्धव ठाकरे यांचे यशस्वी नेतृत्व असून, अंधेरीची निवडणूक आम्हीच जिंकणार आहोत. आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले असून, आमचा अर्धा प्रचार सुद्धा झाला आहे. मी स्वतः प्रचारासाठी जाणार आहे. अनेकजण माझ्या ओळखीचे असून, घरोघरी मशाल घेऊन मी जाणार असल्याचं खैरे म्हणाले आहे.
निवडणूक आयोगावर टीका...
यावेळी बोलतांना चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाना साधला आहे. चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने दबावात निकाल दिला. गेली काही वर्षे मी दिल्लीत असल्याने मला माहित आहे की, ते कसे वागतात. आमच्याकडे सत्य असताना सत्याचा विजय झाला पाहिजा होता. मात्र यांनी खोटेनाटे प्रकार करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी खोडे घालण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व काही जनतेला दिसते, असेही खैरे म्हणाले.