Aurangabad Crime News: रातोरात पैसे कमवण्यासाठी पार्टटाईम जॉबचा 'टास्क' एका युवकाच्या चांगलेच अंगलट आला आहे. कारण पार्ट टाइम जॉब करून अठराशे ते दहा हजार रुपये कमवा, असे आमिष दाखवून भामट्यांनी या तरुणाला लिंक पाठवून टास्क पूर्ण करण्याच्या अटी घालत दहा लाख 55 हजार 53 रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला आहे. आता या प्रकरणी ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेंद्रा एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीला असलेल्या एका 24 वर्षीय तरुणाला मोबाइलवर पार्टटाइम जॉब म्हणून एक मेसेज आला. त्यात घरबसल्या 1800 ते 10 हजार रुपये कमवा, असा दावा करण्यात आला होता. दरम्यान या तरुणाला सुद्धा पैशांची गरज असल्यामुळे त्याने मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे माहिती दिली. भामट्यांनी व्हाट्सअॅपवर चॅटिंग करीत आधी टेलिग्रामवर पाठवलेली लिंकवरील टास्क पूर्ण करा, अशी अट घातली. तर भामट्यांनी एक लिंक पाठविली. त्यावर या तरुणाने सर्व माहिती भरून यूपीआय लिंकद्वारे 100 रुपये भरले. काही वेळातच त्याच्या खात्यावर 228 रुपये जमा झाले. त्यानंतर पुन्हा एकदा आणखी एक लिंक आली ज्यावर एक हजार रुपये भरण्यास सांगितले गेले. या तरुणाने दुसरा टास्क पूर्ण करताच त्याला 1436 रुपये आले. पुढे त्याने तीन हजार भरले असता चार हजार 399 रुपये आले.
अन् घात झाला...
सुरवातीला तीन वेळा पैसे भरल्यावर मिळालेला भक्कम परतावा पाहून तरुणाने आणखी पैसे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुढचे 'टास्क' पूर्ण करण्यासाठी त्याने पुन्हा वेळोवेळी पैसे भरले. मात्र, टास्क पूर्ण न झाल्याचे कारण देत उद्या टास्क पूर्ण करण्यास सांगितल्याने या तरुणाने तब्बल 28 वेळा एकूण 10 लाख 55 हजार 53 रुपये भरले. पण भरलेले पैसे काढण्यासाठी पुन्हा एकदा नऊ लाख रुपये भरण्याचा टास्क देण्यात आला. तेथेच त्याला शंका आल्याने त्याने रक्कम भरणा करणे बंद केले. तसेच फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
'टास्क'वर टास्क...
सुरवातीला तीन वेळा पैसे परत मिळाल्याने या तरुणाला पूर्णपणे विश्वास बसला होता. त्यामुळे त्याने आपल्याकडेचे सर्व पैसे टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र फोन पेची लिमिट संपल्यावर त्याने मित्राच्या नंबरवरून पैसे टाकले. मात्र त्याला 'टास्क'वर टास्क मिळत गेले आणि तो पैसे टाकत गेला. प्रत्येकवेळी टास्क पूर्ण न झाल्याचे कारण देत उद्या टास्क पूर्ण करण्यास सांगत या तरुणाकडून पैसे उकळण्यात आले. मात्र अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने पैसे भरणं बंद केले. मात्र तोपर्यंत त्याला तब्बल 10 लाखांचा फटका बसला होता.