Aurangabad News: शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire ) आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यातील राजकीय वाद हे काही नवीन नाही. त्यातच आता पुन्हा एकदा खैरे यांनी दानवे यांच्यावर जहरी टीका केली आहे. 'रावसाहेब दानवे एक विचित्र माणूस असून, धोकेबाज असल्याची' टीका खैरे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती असतांनाही दानवे यांनी मला धोका दिला असल्याचं खैरे म्हणाले.
यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात उभा असेलला उमेदवार म्हणजेच त्यांचे जावाई हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी दानवे यांनी प्रयत्न केले. रावसाहेब दानवे एक विचित्र माणूस असून, लोकसभा निवडणुकीत त्यांनी माझ्यासोबत धोकेबाजी केली. मात्र बिचारे जावई त्यांना सोडून गेले. जालना जिल्ह्यातील लोकांचा दानवे यांच्यावर बिलकुल विश्वास नाही, असा खोचक टोला खैरे यांनी यावेळी लगावला.
खोतकर कुठेही जाणार नाही...
शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) शिंदे गटात जाणार का? यावर बोलतांना खैरे म्हणाले की, अर्जुन खोतकर हे त्यांच्या ईडीच्या कामानिमित्त दिल्लीला गेले होते. त्यामुळे ते कुठेही जाणार नाही. त्यांनी जालना जिल्ह्यात शिवसेनेच्या समर्थनात मोठा मोर्चा काढला होता, मी स्वतः या मोर्च्याला गेलो होतो. अर्जन खोतकर हे कडवट शिवसैनिक असून, त्यांचा स्वभाव मला माहित आहे. त्यांचं नाव अर्जुन असून, उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी श्रीकृष्णासारखे आहे. त्यामुळे श्रीकृष्ण कधीही अर्जुनाला मार्गदर्शन करत असतो, असे खैरे म्हणाले.
दानवेंच्या तोंडात मारली होती...
पुढे बोलतांना खैरे म्हणाले की, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांना दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न म्हणजे एक राजकारणाचा भाग आहे. त्या राजकारणावर मी बोलणार नाही, पण खोतकर हीच एक अशी व्यक्ती आहे जे दानवे यांना सरळ करू शकतात. एकदा खोतकर यांनी दानवे यांच्या तोंडात मारली होती, आणि हे दानवे यांना विचारून पहा. त्यामुळे खोतकर हे कडवट शिवसैनिक असून, ते कुठेही जाणार नसल्याचे खैरे म्हणाले.