Chandrakant Khaire: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी औरंगाबाद दौऱ्यावर असतांना महापुरुषांबद्दल केलेल्या एका विधानावरून त्यांच्यावर पुण्यात शाई फेकण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आलेल्या घटनेचा कोणीही समर्थन करू शकणार नाही अशी प्रतिक्रिया सत्तधारी आणि विरोधकांनी व्यक्त केली असतानाच, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मात्र या घटनेचे अभिनंदन केले आहे. 'चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या व्यक्तींचा मी समर्थन केलं नसलं तरीही त्यांचे अभिनंदन करील', असे वक्तव्य खैरे यांनी केले आहे. 


औरंगाबाद दौऱ्यावर असतांना चंद्रकांत पाटील यांनी पैठणच्या संत पिठाच्या कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील, डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शाळा चालवल्या असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर पुण्यात त्यांच्यावर समता सैनिक दलाच्या मनोज गरबडे यांनी पाटील शाई फेकली होती. या घटनेचे राजकीय पडसाद देखील उमटताना पाहायला मिळत आहे. दरम्यान विरोधकांनी देखील अशा शाई फेकीच्या घटनेचं समर्थन करता येणार नसल्याचं म्हटले होते. पण याचवेळी खैरे यांनी मात्र शाई फेकणाऱ्या व्यक्तीचे अभिनंदन केले आहे. 


काय म्हणाले खैरे...


यावेळी बोलतांना खैरे म्हणाले की, शाई लावणाऱ्याचं काही नाही. त्याला राग आलेला आहे म्हणून त्याने हे केलं आहे. मी त्यांचे समर्थन जरी केले नसेल तरीही त्यांचे अभिनंदन करेल. तुमचा राग दिसू द्या असे खैरे म्हणाले. तर जो उठला तो छत्रपती शिवाजी महराज यांच्याबद्दल बोलायला लागला. कोणी काहीही बोलत आहे. राज्यपाल देखील काहीही बोलतात. त्यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांचा किती अपमान होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांनी उडी मारून उतराखंडला गेले पाहिजे, पण ते जात नसल्याचं देखील खैरे म्हणाले. 


चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत वाढ...


महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात राज्यभरात आंदोलन केले जात आहे. अनेक ठिकाणी त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर पुण्यात त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पाटील जातील तिथे पोलिसांच्या विशेष बंदोबस्तसोबतचं क्राईम ब्रँचचे अधिकारी देखील असणार आहे. त्यामुळे पुण्यातील घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. 


Chandrakant Patil: फुले-आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल चंद्रकांत पाटलांची दिलगिरी