Chandrakant Patil: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) औरंगाबाद दौऱ्यावर असून, आज त्यांनी पैठणच्या संत पीठाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कारण शाळा चालू करण्यासाठी फुले, आंबेडकरांनी भीक मागितली, तुम्ही सरकारवर अवलंबून का राहता? असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. एकीकडे राज्यात महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यावरून राजकीय वातावरण तापले असतानाच चंद्रकांत पाटलांनी हे विधान केले आहे.
चंद्रकांत पाटील आजपासून दोन दिवसीय औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज सकाळी त्यांनी पैठणच्या संत पीठाला भेट दिली. यावेळी भाषण करतांना पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चांगल्या कामासाठी पैसे देत आहेत. मात्र सरकारवर अवलंबून का राहत आहे. या देशामध्ये शाळा कोणी सुरु केल्या आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉं. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केल्या. यावेळी त्यांना शाळा सुरु करतांना सरकराने अनुदान नाही दिले. शाळा चालवत आहे, मला पैसे द्या म्हणून त्यावेळी त्यांनी लोकांकडे भिक मागितली. त्या काळात दहा-दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी देणारे आहेत. त्यामुळे कंपन्यांनी सामाजिक कामासाठी दोन टक्के पैसे खर्च करणे गरजेचे आहे. मंदिर आपण उभं करतो, तेव्हा सरकारकडे थोडी पैसे मागतो असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
राजकीय प्रतिक्रिया...
जितेंद्र आव्हाड: चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून इतिहासाचे अज्ञान हे राजकीय नेते महाराष्ट्राच्या समोर आणत आहे. तर इतिहास माहित नसल्याने चंद्रकांत पाटील असे विधान करत आहे. हे मुद्दामहून केले जात आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापुरुषांनी भिका मागितल्या हे काही शब्द आहेत का? असेही आव्हाड म्हणाले.
अमोल मिटकरी: तर यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचे आजचे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे. चंद्रकांत पाटील यांना आठवण करून देतो की, ज्याप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पदासाठी भिक मागीतीली त्याप्रमाणे आमच्या महापुरुषांनी भिक मागीतीली नसल्याचं मिटकरी म्हणाले.
अरविंद सावंत: तर यावर बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, या सर्वांची डोके ठिकाणावर आहेत की, नाही असा प्रश्न पडत आहे. जेव्हा या सर्व महापुरुषांनी कष्टाने शाळा उभा केल्या, त्यावेळी इंग्रजांचा काळ होता. सरकारची जबाबदारी असते ती त्यांनी पहिली पाहिजे. तसेच मूळ विषय सोडून नको ते वक्तव्य यांनी करू नयेत असा इशारा सावंत यांनी दिला.