मुंबई : एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)  वाढदिवसी आणखी एक धक्का दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्याकडून शिवसेनेच्या नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.  शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे. 


किरण पावसकर, संजय मोरे यांची शिवसेना सचिव पदी नियुक्ती 


या अगोदर आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दिपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती कायम राहणार आहे. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 




मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप


 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे यांना देण्यात आली. तर बाकी शिलेदराना देखील ती लवकरच देण्यात येतील. या नियुक्त्यामुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे, असे म्हटले आहे. 


शिवसेनेतील अंतर्गत वाद सुप्रीम कोर्टात


शिवसेनेतील अंतर्गत वादावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी शिवसेनेने पावले उचलली आहेत तर दुसरीकडे नवीन नियुक्त्या जाहीर  करत  शिंदे गटाने आव्हान दिले आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाविरोधात बंड पुकारले. त्यानंतर 12 खासदार देखील शिंदे गटात सामिल झाले. खासदारांनी बंड पुकारल्यानंतर या खासदारांनी मूळ शिवसेना पक्ष आमचाच असल्याचा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाने केला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला पक्षावरील हक्क सांगण्याबाबत नोटीस बजावली आहे. दोन्ही बाजूंना आठ ऑगस्टपर्यंत बाजू मांडण्यास सांगितली आहे.