Aurangabad News: राज्यभरात आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. दरम्यान यासाठी गावागावातून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतात. मात्र औरंगाबाद जिल्ह्यात यावेळी गणेशोत्सवात डीजे वापरण्यासाठी बंदी असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. परंतु तरीही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी डीजे लावण्यात आल्याने पोलिसांनी कारवाई करत डीजे ताब्यात घेतले आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या बिडकीन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.


औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पोलीस स्टेशन बिडकीन हद्दीतील शेकटा येथे आज गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे मिरवणुकीची तयारी म्हणून वाहन क्रमांक MH-11-T-6592 आयशर आणि वाहन क्रमांक MH-39-C-6791 अशा दोन वाहनांमध्ये डीजे बसवून सराव सुरू होता. दरम्यान याची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी गावात जाऊन दोन्ही डीजे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावले आहेत. याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.


डीजे नकोच, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


गणेश उत्सव सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी एक आदेश काढले आहे. ज्यात जिल्ह्यात डीजे वाजवण्याबाबत कलम 144 ची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे गणेशोत्सव काळात डीजे वाजवता येणार नाही. तसेच ज्या ठिकाणी डीजे उभे आहेत त्याच ठिकाणी त्याला प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र असे असताना देखील औरंगाबादच्या शेकटा गावात डीजे लावण्यात आल्याने अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे.


आरटीओला पत्र पाठवणार...


या कारवाई प्रकरणी बोलतांना बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने म्हणाले की, संबंधित डीजे चालकाने कोणतीही परवानगी न घेता वाहनांमध्ये बदल करून आरटीओ नियमांचे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे याप्रकरणी आरटीओ विभागाला पत्र पाठवून संबंधित वाहनाची चौकशी करून कारवाईची विनंती करणार असल्याचं माने म्हणाले.


जिल्ह्यातील पहिलीच कारवाई...


स्थानिक जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव काळात डीजेला बंदी घातली आहे. मात्र असं असताना शेकटा गावात डीजे लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र या वर्षातील गणेशोत्सव काळातील डीजेची ही औरंगाबाद जिल्ह्यातील पहिलीच कारवाई समजली जात आहे. तर आज होणाऱ्या गणेशोत्सव विसर्जनात कोणीही डीजे लावू नये आणि नियमांचे पालन करावे असा आवाहन प्रशासनाने केला आहे


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: गणेश विसर्जनावेळी औरंगाबाद शहारतील 'हे' मार्ग राहणार बंद; वाहतूक पोलिसांची माहिती


Aurangabad: गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी वाजवण्यावर बंदी; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडून 144 चे आदेश