Aurangabad Crime News: पैठण तालुक्यातील राहटगाव येथे काही दरोडेखोरांनी दगडफेक करून ट्रक चालकांना लुटण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळताच पैठण पोलिसांनी त्या दिशेने धाव घेतली. मात्र चोरच खुद्द पैठण शहराच्या दिशेन आले आणि सुरु झाला चोर पोलिसांचा खेळ. पुढे दरोडखोरांची गाडी आणि मागून पोलिसांची एक चारचाकी-दुचाकीने पाठलाग सुरु झाला. 15 ऑगस्च्या मध्यरात्री सुरु झालेला हा थरार तब्बल अर्धा तास चालला. मात्र पैठण पोलिसांनी दरोडेखोरांच्या गाडीला घेरावा घालत अखेर त्यांना ताब्यात घेतले. सोमनाथ दादासाहेब नरवडे (वय 20 वर्ष, रा. घोटण, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) आणि स्वप्नील मारोती दराडे (वय 19 वर्ष, रा. पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे आरोपींचे नावं आहेत. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन पैठण हद्दीमध्ये रात्रीच्या साडेबारा वाजेच्या सुमारास कर्नाटक राज्यातुन कोपरगाव व नाशिक येथे माल वाहतुक करणारा ट्रकला एका बोलेरो वाहनातील दोन इसमांनी रहाटगाव फाटा येथे अडवले. ट्रक चालक व वाहकाला तलवारीचा धाक दाखवुन त्यांना चापटबुक्क्याने लाथाने मारहाण करुन त्यांच्याकडील 1400 रुपये बळजबरीने काढुन घेतले. या घटनेची माहिती मिळताच रात्रगस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांचा स्टाफ घटनास्थळाकडे रवाना झाला. मात्र त्याचवेळी आरोपी सुद्धा पैठणकडे येत असल्याची माहिती पवार यांना मिळाली. 


पुढे दरोडेखोर मागे पोलीस...


ट्रक चालकांना लुटणारे पैठणकडे येत असल्याची माहिती मिळताच पवार यांनी आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहून आरोपींनी गाडी पैठण शहाराकडे वळवली. मग पुढे दरोडेखोर मागे पोलीस असा खेळ सुरु झाला. याचवेळी शहरात दुचाकीवरून पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांकडून सुद्धा आरोपींच्या गाडीचा पाठलाग सुरु झाला. त्यांनतर अर्ध्या तासांनी पोलिसांनी आरोपींना अखेर अडवून ताब्यात घेतले. 


Aurangabad: रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी घातल्या बेड्या, दोन महिलाही ताब्यात


आरोपींनी तीन दिवसांपूर्वी अहमदनगरमध्येही केली लूटमार 


दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे 1800 रुपये रोख, विविध कंपन्याचे तीन महागडे मोबाईल, घातक शस्त्र तलवार, एक फोल्डींगाचा रामपुरी चाकु असे वाहनासह एकुण 6 लाख 46 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आरोपींनी तीन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात देखील जबरी चोरीचा गुन्हा केला आहे. एका व्यक्तीला चाकुचा धाक दाखवून, मारहाण करुन 9  हजार रुपयाचा रेडमी कंपनीचा मोबाईल आणि 5 हजार रुपये रोख असे जबरीने काढून घेतले होते. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.