Aurangabad: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा आणि बीड जिल्ह्यात रविवारी झालेल्या भीषण अपघाताची घटना ताजी असताना काही वेळेपूर्वी औरंगाबादच्या कसाबखेड्याला जाणाऱ्या कीन्हळ फाट्यावरील एका अपघाताच्या बातमीने काळजात धडकी भरवली होती. मात्र सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची सुखद माहिती समोर आली आहे. अंदाजे 35 ते 40 प्रवाशी घेऊन जाणारी बस अचानक पलटी झाल्याने हा अपघात झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिऊरवरून औरंगाबादला प्रवासी घेऊन जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसला दोन वाजेच्या सुमारास अपघात झाला. रस्त्यावर असलेल्या चिखलामुळे चालकाचा नियंत्रण सुटले आणि बस पलटी झाली. अचानक झालेल्या अपघातामुळे आतील प्रवासी मोठ्याप्रमाणावर घाबरून गेले होते. अनेकांना मुक्क मार लागला आहे.
नागरिकांची तात्काळ मदत मिळाली...
चालती बस अचानक पलटी झाल्याने रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी तात्काळ मदतकार्य करत आतील नागरिकांना बाहेर काढले. यात अनेकांना मार लागला आहे. तर काहींना मुक्का मार लागला आहे. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच बसचा वेग कमी असल्याने आणि रस्त्यावर इतर मोठं वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
रस्त्याचे काम सुरु असल्याने चिखल...
कीन्हळ फाट्याजवळ सद्या रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर माती असून, पाऊस पडताच चिखल होतो. दरम्यान दुपारी दीड वाजता वाशीम आगाराची बस कीन्हळ फाट्या जवळ चालू असलेल्या नवीन कामाच्या ठिकाणी पलटी झाली. रस्त्यावर चिखल असल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस पलटी झाली असल्याची माहिती बसमध्ये प्रवास करत असलेल्या प्रवाशांनी दिली आहे. नागरिकांनी तात्काळ मदतकार्य केल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र यावेळी पोलीस किंवा प्रशासनाची वेळेवर मदत मिळाली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
गेल्या आठवड्यात सुद्धा असाच अपघात...
ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, ठीक-ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे सतत छोटे-मोठे अपघात होतच असतात. दरम्यान गेल्या आठवड्यात सुद्धा लासूर स्टेशनहून गवळी शिवारला जाणारी बस खड्ड्यात आदळल्याने चालू गाडीचे टायर निखळले होते. एकाचवेळी दोन टायर निघून पडल्याने बस एकाबाजूला झुकली होती. मात्र चालकाने वेळीच बस जागेवर थांबवल्याने मोठा दुर्घटना टळली होती.
महत्वाच्या बातम्या...
Aurangabad: धक्कादायक! धावत्या बसचे दोन टायर निखळले, दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा...
Aurangabad: रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी घातल्या बेड्या, दोन महिलाही ताब्यात