Aurangabad Crime News: रेल्वेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण पाच आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या 22 लाख 43 हजार 400 रुपयांचा मुद्देमालासह 11 तोळे सोने जप्त केलं आहे. विशेष म्हणजे या टोळीत दोन महिलांचा सुद्धा समावेश आहे. 


याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावचे राहणारे हरीश्चंद्र वरखडे हे एका पीशवीत42 तोळे सोने आणि रोख 52 हजार 400 रुपये घेऊन रेल्वे स्टेशन जळगाव येथून हावडा-मुंबई एक्सप्रेसने जळगाव ते मुंबई असा प्रवास करीत होते. दरम्यान त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरटयांनी वरिल मुददेमाल असलेली पिशवी चोरुन नेली होती. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी सराईत गुन्हेगार सतबीरसिंग बलवंतसिंग टाक (वय 19 वर्षे रा. तांबापुरा जळगाव)  याला रेल्वेतच ताब्यात घेतले असता त्याने रहीम खॉन रशीद खॉन (वय 22 वर्षे रा. ताबांपुरा ता. जि. जळगाव)  याच्यासोबत मिळुन चोरी केल्याची कबुली दिली. 


पोलीस पथक आरोपींच्या शोधात 


मात्र चोरीस गेलेला मुददेमाल घेऊन रहीम शेख फरार झाला होता. त्यामुळे औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या सुचनेनुसार तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक रहीम शेखच्या शोधात रवाना करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तांत्रीक बाबींच्या मदतीने रहीम हा पाचोराकडुन कोणत्यातरी वाहनाने जळगाव कडे येत असल्याचं शोधून काढले. 


भर पावसात लावला ट्रॅप


मिळालेल्या माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी पाचोरा ते जळगाव रोडवर पोलीस स्टेशन जळगाव MIDC येथील स्थानिक पोलीसांची मदत घेऊन भर पावसात ट्रॅप लावला. दरम्यान रात्री 12  वाजेच्या सुमारास एक रिक्षा पाचारोकडुन जळगावकडे येत असतांना पोलिसांना दिसला. पोलिसांनी यावेळी त्यास थांबण्याचा इशारा केला असता रिक्षाच्या मागील बाजुच्या पडदयामधुन रहीम उडीमारुन पळुन जावु लागला असता त्याचा पोलिसांनी पाठलाग केला, परंतु तो अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला.


आरोपींना ठोकल्या बेड्या


त्यांनतर पोलिसांनी अडवलेल्या रिक्षामध्ये पाहणी केली असता भावना जवाहरलाल लोढा (वय 40 वर्षे),  तनीष्का भावना लोढा (वय 22 वर्षे, दोन्ही रा. रौनक नगर जळगाव)  आणि अनिल रमेश चौधरी (वय 40 वर्षे रा. अयोध्या नगर, जळगाव) मिळून आले आहेत. त्यांची झडती घेतली असता गुन्ह्यात चोरीला गेलेला मुद्देमाल मिळून आला. त्यांनतर रहीम याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या सर्व गुन्ह्यात उल्लेखनिय कामगीरी करणाऱ्या पथकाला पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी 10 हजार रोख बक्षीस व प्रशंशापत्र घोषीत केले आहे.