Aurangabad News: औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला आज विधानसभेत मंजुरी देण्यात आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर (SambhajiNagar) तर उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नाव धाराशिव (dharashiv ) करण्याची मागणी होत होती. विशेष म्हणजे यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुद्धा मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता विधानसभेत सुद्धा नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणातून अनेक घोषणा केली. तर अनेक प्रस्तावांना सुद्धा मंजुरी देण्यात आली. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. सोबतच नवी मुंबई विमानतळचं नामांतर दि बा पाटील करण्याच्या प्रस्तावाला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे.
तिसऱ्यांदा मंजुरी...
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला आज तिसऱ्यांदा मंजुरी मिळाली आहे. यापूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन वेळा नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यापूर्वी शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीत नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. आता तिसऱ्यांदा नामांतराच्या प्रस्तावाला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे.
न्यायालयात याचिका दाखल...
एकीकडे औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या प्रस्तावाला तिसऱ्यांदा मंजुरी मिळाली असताना, दुसरीकडे याच नामांतराला विरोध करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते असलेले अहमद मुस्ताक यांनी ही याचिका दाखल केली आहे. शहराचे नाव बदलल्यास दोन समाजात तेढ निर्माण होईल आणि उद्याच्या पिढीला हे सहन करावं लागणार आहे. शहरात शांतता कायम राहावी यासाठी या शहराचं नाव औरंगाबादच राहिलं पाहिजे असं याचिकाकर्ते अहमद मुस्ताक यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.
'एमआयएम'चा विरोध
औरंगाबादच्या नामांतराला एमआयएमने उघडपणे विरोध केला आहे. तर याला विरोध करण्यासाठी एमआयएमने भव्य असा मोर्चासाठी काढला होता. नाव बदलल्याने शहराचा विकास होणार आहे का? असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला होता. तर नामांतराचा मुद्दा फक्त आपल्या राजकीय हितासाठी वापरला जात असल्याचा आरोपीही जलील यांनी केला होता. त्यामुळे आता विधानसभेत नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर जलील यांची प्रतिक्रिया काय असणार आहे हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या...
पुन्हा औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर; शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
Aurangabad: नामांतराच्या लढ्यासाठी वकिलांची फौज उभी करणार; जलील यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक