Ganeshotsav 2022 : यावर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच (बुधवारी) बाप्पाचं आगमन होणार आहे. तर कोकणात गौरी गणपतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. कोकणचे नागरिक सर्वांत जास्त मुंबईत वास्तव्यास आहेत. ते गौरी गणपतीसाठी मोठ्या प्रमाणात गावी जातात. त्यांच्या सेवेसाठी मराठवाड्यातील विविध आगारांतून बस मुंबई कोकण अशी सेवा देण्यासाठी सज्ज आहे. औरंगाबाद विभागातूनही 165 बस 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबरदरम्यान मुंबई-कोकण अशी सेवा देण्यासाठी मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या (ST Mahamandal) वतीने देण्यात आली.
मुंबईत कोकणात जाणाऱ्यांसाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून (ST) मोठ्याप्रमाणावर एसटी बस सोडल्या जातात. मुंबईतील बससंख्या अपुरी पडत असल्याने राज्यातील विविध भागातून बस मागवल्य जातात. दरम्यान मराठवाड्यातील विविध आगारांतून बसची मागणी होते. या मागणीनुसारच औरंगाबाद विभागातून 165 बसची मागणी करण्यात आली आहे. या बस 27 ऑगस्ट रोजी मुंबई येथे पोहोचणार असून त्या मुंबई-कोकण या मार्गावर 10 सप्टेंबरपर्यंत सेवा देणार आहेत. त्यानंतर त्या परतीच्या मार्गावर येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
एसटी महामंडळाकडून नियोजन
कोकणातील सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव समजला जातो. त्यामुळे या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. तर दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईसह अन्य भागातून तीन ते चार दिवस आधीच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून नियोजन करण्यात येत आहे. यासाठी इतर जिल्ह्यातून एसटी बसेस (ST Bus) मागवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या तीन वर्षांच्या कालखंडानंतर पहिल्यांदाच मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार असल्याने त्यानुसार बसेसची व्यवस्था करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून केला जात आहे.
येथून निघणार बस...
अ.क्र. | आगार | बसची संख्या |
1 | मुख्यस्थानक | 30 |
2 | सिडको | 30 |
3 | पैठण | 20 |
4 | सिल्लोड | 20 |
5 | कन्नड | 20 |
6 | वैजापूर | 20 |
7 | गंगापूर | 15 |
8 | सोयगाव | 10 |
रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल
कोकणात येणाऱ्या कोकण रेल्वे गाड्यांचे गणेशोत्सवाच्या काळातील आरक्षण जवळपास फुल्ल झालं आहे. त्यामुळे 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान अनेक रेल्वे गाड्यांच्या सर्व श्रेणीतील आसने आरक्षित झाली असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे काही गाड्यांना तर मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा यादी आहे. त्यामुळे यावेळी रेल्वे, कोकण आणि पश्चिम रेल्वेला मोठ्या प्रमाणात जादा गाड्या सोडाव्या लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.