Aurangabad City Bus: औरंगाबाद स्मार्ट सिटीअंतर्गत (Smart City) सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेला सोमवारी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने बससेवेचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने सोमवारी सकाळी 9 वाजता मुकुंदवाडी बसडेपो येथे महिलांसाठी विशेष बस (Women Special Bus) सेवा सुरू करण्याची घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, या चार वर्षांत आतापर्यंत दीड कोटी नागरिकांनी बसमधून प्रवास केला आहे. 


याबाबत महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रशासक, सीईओ डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनखाली सध्या 80 बस शहरातील विविध मार्गांवर धावत आहेत. आतापर्यंत बससेवेचा लाभ जवळपास दीड कोटी प्रवाशांनी घेतला. या काळात 150  बस स्थानक, ई-तिकीट स्मार्ट कार्ड आणि अन्य सेवेचाही लाभ नागरिकांना मिळत आहे. शहर बससेवेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जाधववाडी परिसरात नवीन बसडेपो बांधण्यात येत आहे. शहरात जी-20 अंतर्गत वुमेन-20चे प्रतिनिधी मंडळ भेट देणार आहेत. या निमित्ताने महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याबाबत घोषणा होणार आहे. तसेच चालक आणि वाहक यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बस विभागाचे प्रमुख राम पवनीकर आणि व्यवस्थापक ऋषिकेश इंगळे आदी काम पाहत असल्याची माहिती महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. 


नव्याने 35 इलेक्ट्रिक बसेस सुरू होणार 


विशेष म्हणजे, सिटी बस सेवेच्या पाचव्या वर्षी औरंगाबाद स्मार्ट सिटीतर्फे 35 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहे. ह्या बसेस वातानुकूलित असतील आणि स्वच्छ हवेसाठी महत्वाच्या ठरतील. औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवेचा चौथा वर्धापन दिन सोमवार सकाळी 9 वाजता मुकुंदवाडी डेपो येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. 


महिलांसाठी विशेष बस सुरु करणार 


गेल्या चार वर्षांपासून औरंगाबाद शहरात शहर बस सुरु आहे. कोरोना काळ आणि एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे बस सेवा विस्कळीत झाली होती. अनेक बसेस जागेवर उभ्या होत्या. मात्र त्यानंतर महानगरपालिकेने माजी सैनिकांची भरती करत पुन्हा बस सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आता शहर बस सेवेला चार वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे यानिमित्ताने प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला असून, सोमवारी सकाळी 9 वाजता मुकुंदवाडी बसडेपो येथे महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे शहरातील महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या: 


औरंगाबादकरांसाठी खूशखबर! लवकरच म्हाडाच्या 828 घरांची लॉटरी, स्वस्तात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार