Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अखेर पार पडला आहे. ज्यात यापूर्वी मंत्री राहिलेल्या अनेकांना संधी मिळाली आहे. दरम्यान औरंगाबाद पूर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांना सुद्धा दुसऱ्यांदा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. यापूर्वी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात सावे यांना राज्यमंत्री पद मिळाले होते. मात्र शेवटच्या टप्प्यात संधी मिळाली असल्याने त्यांना जास्त दिवस मंत्री पदावर राहता आले नाही.
शिवसेनेचे मराठवाड्यातील पहिले खासदार आणि औरंगाबादचे सेनेचे पहिले महापौर मोरेश्वर दीनानाथ यांचे पुत्र असलेले अतुल सावे यांनी 2014 मध्ये भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. याच निवडणुकीत त्यांना यश मिळाले. त्यांनतर राज्यात युतीची सत्ता आली. मात्र सावे यांना सरकारचा तीन-चार महिन्याचा कालावधी शिल्लक असतांना मंत्रिपद मिळाले. त्यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म अल्पसंख्यांक विकास व वक्फ बरोबरच हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी मिळाली. त्यांनतर आता पुन्हा एकदा सावे यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
राजकीय प्रवास...
- 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले.
- 2018 मध्ये भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री झाले.
- 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले.
- 2022 मध्ये शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदी संधी.
महापालिकेची मोठी जवाबदारी...
आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता औरंगाबादमध्ये आपली सत्ता आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. त्या अनुषंगाने भाजपकडून सावे यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादमध्ये आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी भाजपकडून तसा प्रयत्न सुरु आहे. आधीच कराड यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यात आता सावे यांच्या निमित्ताने राज्य सरकारमध्ये कॅबिनेट पद देऊन भाजपकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सावे यांच्यावर पक्षाची मोठी जवाबदारी असणार आहे.